एमआयडीसीत गुंडगिरी. हफ्तेखाेरी चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:17+5:302021-01-25T04:27:17+5:30
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील विविध उद्योगांमधून गेल्या वर्षभरापासून काही वाईट प्रवृत्तीचे लोक खंडणी, वर्गणीसाठी उद्योजकांकडे जात असल्याच्या घटना ...
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील विविध उद्योगांमधून गेल्या वर्षभरापासून काही वाईट प्रवृत्तीचे लोक खंडणी, वर्गणीसाठी उद्योजकांकडे जात असल्याच्या घटना घडत आहेत. हे प्रकार उद्योग विकासाच्या दृष्टीने घातक आहेत. या प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी आता कृष्णा व्हॅली चेंबरने उद्योजकांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून, अशा प्रवृत्तीचे लोक कारखाना आवारात आल्यास उद्योजकांनी चेंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व माजी अध्यक्ष सतीश मालू यांनी केले आहे.
कुपवाड औद्योगिक वसाहत आणि परिसरातील विविध उद्योगांमधून उद्योजकांना आर्थिक खंडणी, वर्गणीसाठी धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे वारंवार निर्दशनास आले आहेत. हे प्रकार घडणे हे उद्योग वाढीच्या आणि विकासाच्यादृष्टीने घातक आहे. कुपवाड परिसरातील, जिल्ह्यातील बेरोजगांराच्या हाताला काम देण्याबरोबरच देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या उद्योजकांना अशा वाईट प्रवृत्तीकडून नाउमेद करण्याचे हे कृत्य चुकीचे आहे. याला पायबंद घालण्यासाठी आता कृष्णा व्हॅली चेंबरने कंबर कसली असून, औद्योगिक वसाहतीतील एकाही उद्योजकाला खंडणी, वर्गणीसारख्या घटनांना सामोरे जावे लागणार नाही. याची खबरदारी चेंबरने घेतली आहे. कोणी उद्योजकांवर दबाव आणल्यास किंवा धमकावल्यास उद्योजकांनी त्वरित चेंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व माजी अध्यक्ष सतीश मालू यांनी केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक रमेश आरवाडे, दीपक मर्दा, रतिलाल पटेल, हरी गुरव, बाळासाहेब पाटील, अरुण भगत, हेमलता शिंदे, नितीश शहा उपस्थित होते.