आटपाडीत विद्यार्थी संघटनेच्या नावावर गुंडगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:14+5:302021-09-07T04:33:14+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : आटपाडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकास मारहाण करून तोंडाला काळे फासण्याचा प्रकार शनिवारी घडला. ...

Bullying in the name of Atpadi student union | आटपाडीत विद्यार्थी संघटनेच्या नावावर गुंडगिरी

आटपाडीत विद्यार्थी संघटनेच्या नावावर गुंडगिरी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आटपाडी : आटपाडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकास मारहाण करून तोंडाला काळे फासण्याचा प्रकार शनिवारी घडला. हा प्रकार म्हणजे संघटनेच्या नावाखाली गुंडगिरी असल्याचे स्पष्ट होत आहे. सतत गैरहजर राहणाऱ्या, महाविद्यालयातील मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय झाल्याचा कांगावा करत विद्यार्थी संघटनेने प्राध्यापकाला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आटपाडीतील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या अकरा शिक्षक आहेत. १८४ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनी आहेत. वीजतंत्री विभागात प्रथम वर्षात शिकणारा स्वप्नील संकपाळ (रा. जत) हा विद्यार्थी १७७ दिवसांपैकी ५७ दिवस गैरहजर होता. त्याला हजर राहण्यासाठी कळविण्यात येत होते. २५ ऑगस्ट रोजी ताे अचानक हजर झाला. त्यावेळी प्रा. बोडरे यांनी त्याचा मागील अभ्यास वर्गात खाली बसून पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर संकपाळ दि. २६ रोजी कुणाला न सांगता गावी गेला. ताे थेट संघटनेचे पदाधिकारी घेऊन शनिवारी आला. त्यावेळी गैरवर्तन केल्याचा कांगावा करीत प्रा. बोडरे यांना आठ जणांनी मारहाण करून तोंडाला काळे फासले. विशेष म्हणजे संघटनेच्या वतीने किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने प्राचार्याकडे यापूर्वी कोणतीही तक्रार देण्यात आलेली नव्हती. याच विद्यार्थ्यांसह तिघांनी महाविद्यालयातील मुलींची नावे संशयास्पदरीत्या काही ठिकाणी लिहिल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मुलींच्या नातेवाइकांनी मारहाण करण्यासाठी धाव घेतल्यावर प्राध्यापकाने तो प्रसंग समजुतीने टाळला होता. याप्रकरणी संकपाळ याने दि. २२ मार्च रोजी पालकांसह महाविद्यालय प्रशासनाला आपली चूक झाली हे मान्य करून यापुढे असे घडणार नाही, असा माफीनामाही दिला होता. त्यामुळे आता विद्यार्थी संघटनेने केलेल्या कथित आंदोलनाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट

आंदोलक म्हणाले पेट्रोलचे पैसे द्या!

शनिवारी प्रा. बोडरे यांना कथित रॅगिंग आणि लैंगिक शोषणाचा आरोप करून मारहाण करणाऱ्या आंदोलकांनी नंतर आम्ही सांगलीला जाणार आहोत. आम्हाला येण्या-जाण्याच्या पेट्रोल खर्चासाठी पैसे द्या, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी ‘तुम्हाला चहा-नाश्ता देतो’ असे सांगत बोळवण केली. संघटनेने दिलेल्या तक्रारीत त्या विद्यार्थ्याचा काय छळ केला? रॅगिंग केले किंवा लैंगिक शोषण केले? याचा स्पष्ट उल्लेख नाही. प्राचार्यांनी वारंवार बोलावूनही हा विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आटपाडीत यायला तयार नाहीत.

कोट

संबंधित प्राध्यापक हे हंगामी तत्त्वावर काम करीत होते. त्यांना कामावरून कमी केले आहे.

- ए. एल. शिंदे

प्रभारी प्राचार्य

कोट

माझ्या मोबाइलवरून काही चॅटिंग त्या विद्यार्थ्याच्या मोबाइलवर केल्याचे मला काल कळले. बाकी कसलीच तक्रार नाही. माझ्यावर अन्याय केला आहे. विद्यार्थी संघटनेने मारहाण करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती.

- प्रा. विकास बोडरे

Web Title: Bullying in the name of Atpadi student union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.