घोटाळ्याचा बोजा उतरणार, व्याज मानगुटीवरच
By admin | Published: June 29, 2016 11:31 PM2016-06-29T23:31:13+5:302016-06-29T23:58:59+5:30
जिल्हा बॅँक : चौकशी अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणार, दिलासा मिळाल्यानंतरही चिंता कायम राहण्याची चिन्हे
सांगली : जिल्हा बॅँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणातून २ कोटी १६ लाख रुपयांचा आक्षेप रद्द केला जाणार आहे, मात्र त्या रकमेवरील व्याज यात अडकलेल्या तत्कालीन संचालकांना लागू होणार आहे. त्यामुळे बोजा हलका झाला, तरी व्याजाचे भूत मानगुटीवर लटकणार असल्याने संचालकांची चिंता वाढणार आहे.
वसंतदादा कारखान्याकडून या प्रकरणातील २ कोटी १६ लाख रुपयांचा धनादेश वठल्याने त्याबाबतचे पत्र संचालकांनी बँकेकडून घेतले आणि ते चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केले. बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनीही चौकशी अधिकाऱ्यांना संबंधित रक्कम जमा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे हा बोजा आता कमी होणार आहे.
जिल्हा बँकेचे २००१-०२ ते २०११-१२ या कालावधीतील प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. यातून ४ कोटी १८ लाख रुपयांचा ठपका तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला होता.
चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
आक्षेपांमध्ये सर्वात मोठा आक्षेप वसंतदादा कारखान्याच्या बँक गॅरंटी शुल्काचा आहे. त्यामुळे याप्रकरणी अडकलेल्या विद्यमान संचालकांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून, ही रक्कम परत बँकेकडे भरण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारखान्याने ही रक्कम जमा केली.
संचालकांनी रक्कम जमा झाल्याबाबत बँकेचे पत्र घेऊन ते चौकशी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेकडे विचारणा केल्यानंतर अध्यक्षांनी रक्कम जमा झाल्याचे सांगितले. त्यामुळे हा बोजा उतरविला जाणार आहे. मात्र आक्षेप घेतल्यापासून या रकमेवरील रितसर व्याज आकारले जाणार आहे. त्याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे बोजा उतरताना व्याजाची चिंता आता संचालकांना सतावणार आहे. (प्रतिनिधी)
चौकशी थांबलेलीच...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या घोटाळाप्रकरणी चौकशीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन निकाल लागल्यानंतरच यासंदर्भातील कारवाई होणार आहे. व्याज लागू करण्याचे संकेत चौकशी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, व्याज आकारणीस संचालकांचा विरोध होण्याची चिन्हे आहेत.
संचालकांकडून व्याजाच्या आकारणीस विरोध
व्याज आकारणीच्या मुद्याबाबत काही संचालकांनी विरोध केला आहे. अशी नोटीस प्राप्त होताच आम्ही त्यास विरोध करू. वास्तविक बॅँक गॅरंटी वसुलीची जी गोष्ट राज्य बॅँकेला शक्य झाली नाही, ती सांगली जिल्हा बॅँकेने करून दाखविली असताना पुन्हा त्यात व्याजाचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे, असे काही संचालकांनी सांगितले.