स्पर्धा परीक्षेतून ऊस तोडणी मजूर बनला अधिकारी : बोरगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:05 AM2018-12-12T01:05:57+5:302018-12-12T01:06:39+5:30
ऊसतोड मजूर असणाऱ्या आई, वडिलांचे छत्र हरपले... स्वत:च्या आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी... त्यामुळे त्यानेही ऊस तोडणी मजुरीचा मार्ग स्वीकारला.
इस्लामपूर : ऊसतोड मजूर असणाऱ्या आई, वडिलांचे छत्र हरपले... स्वत:च्या आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी... त्यामुळे त्यानेही ऊस तोडणी मजुरीचा मार्ग स्वीकारला. पोराची जिद्द बघत बोरगावच्या ग्रामस्थांनी त्याला मदतीचा हात दिला. ग्रामस्थांची मदत आणि अपार कष्ट या जोरावर बीड जिल्ह्यातील सोमनाथ नारायण सदगर याने नगरपालिका अभियंता वर्ग २ पदाला गवसणी घातली.
येथील सोमनाथ सदगर याच्या जिद्दी यशाची ही वाटचाल इतर विद्यार्थ्यांना पथदर्शी आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील हटकरवाडीचा. आई—वडील ऊस तोड मजूर असल्याने ते परजिल्ह्यात जाऊन ऊस तोडणीची कामे करायचे. बोरगाव परिसरात त्यांचा बराच काळ या मजुरीसाठी व्यतित झाला. मुलाला खूप शिकवायचे, अशी या कष्टकºयांची अतीव इच्छा. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. सोमनाथ दुसरीला असतानाच आई साखराबाई यांचे निधन झाले. वडील नारायण सदगर यांनी काही काळ त्याची जबाबदारी पार पाडली. पण सोमनाथ सातवीत असताना पुन्हा एकदा त्याच्यावर काळाने घाव घातला. सोलापूर जिल्ह्यातील एका कारखान्यासाठी ऊस तोडणीसाठी गेल्यावर वडिलांचा खून झाला. हा त्याच्यावर मोठा आघात होता.
या घटनेमुळे सोमनाथ हा पुरता कोसळून गेला. स्वत:सह बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्याने ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी बोरगावमधील काही संवेदनशील मनाच्या ग्रामस्थांनी सोमनाथची जबाबदारी स्वीकारली.
या ग्रामस्थांच्या मदतीच्या बळावर त्याने स्थापत्य अभियांत्रिकीचे (सिव्हिल) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक डी. आर. सलगर, प्रकाश वाटेगावकर, चंद्रकांत गावडे, सुहास पोळ, मुकुंद वाटेगावकर, शिंदे कुटुंबीय, कारखान्याचे अभियंता जे. बी. पाटील, डी. एम. पाटील यांनी त्याला सर्वतोपरी मदत केली. त्यानंतर अशोक वाटेगावकर यांनी त्याला इस्लामपूरच्या गुरुकुल अॅकॅडमीत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दाखल केले. तेथेच त्याने अभ्यास केला.
प्रतिकूल परिस्थितीवर केली मात
सोमनाथ सदगरने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने आपले ध्येय गाठले आहे. सोमनाथने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून नगरपालिका अभियंता वर्ग २ हे पद मिळवत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्याला या खडतर प्रवासात साहाय्य करणाऱ्यांच्या मदतीला त्याच्या यशाने सलाम केला.