बिऊर येथे घरफाेडी; तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:39+5:302021-04-07T04:28:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी ६ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख १५ हजार रुपये, असा ३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवार, दि. ६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
प्रकाश पाटील हे पत्नी व मुलाला घेऊन शिराळा येथे दवाखान्यात गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान चोरट्यांनी पाटील यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, अंगठी, कर्णफुले, लहान मुलांचे दागिने, असे ६ तोळे सोन्याचे दागिने, किरकोळ चांदीचे दागिने व रोख रक्कम १५ हजार, असा जवळपास ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. चाेरीनंतर घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी लावून चाेरट्यांनी मागील दरवाजाने पलायन केले. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानपथक घराभोवतीच घुटमळले, ठसे तज्ज्ञांनी कपाटावरील ठसे घेतले आहेत. घटनास्थळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सुखदेव पाटील, धनाजी पाटील, पोलीस पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत प्रकाश पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून, तपास हवालदार डी. जी. कुंभार करीत आहेत.
चौकट
आठवड्यात दुसरी घटना
पाटील यांनी दि. २ एप्रिल रोजी मध्यवर्ती बँकेतून हे दागिने सोडवून आणले होते. दोन दिवस बँकांना सुटी असल्याने ते कपाटात ठेवले होते. येथेच अडकवलेल्या पँटच्या खिशात वीस हजार रुपये होते. मात्र चोरट्याला ते मिळाले नाहीत. त्यामुळे ही रक्कम वाचली. शिराळा येथे दि. २६ मार्च रोजी सुधीर जाधव यांच्या घरातून २२ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख, असा ऐवज चोरीस गेला होता. या घटनेतील चोरट्यांचाही अद्याप शोध लागलेला नाही. आठवडाभरात ही दुसरी चोरी झाली आहे.