मिरजेत दुसऱ्या दिवशीही घरफोडी
By admin | Published: December 14, 2014 12:38 AM2014-12-14T00:38:27+5:302014-12-14T00:40:58+5:30
दीड लाखाचा ऐवज लंपास : चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मिरज : मिरजेत यशवंत कॉलनीत चोरट्यांनी बंगला फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास केला. श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मिरजेत सलग दुसऱ्या दिवशी घरफोडी करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे.
कोकणे गल्लीत यशवंत कॉलनीत सुधीर दत्तात्रय गलांडे यांचा बंगला आहे. सीसीटीव्ही साहित्याची विक्री करणारे सुधीर गलांडे कामानिमित्त गोव्याला गेले होते. त्यांच्या पत्नी नातेवाइकांकडे गेल्याने बंगल्याला कुलूप होते. अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्री बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, नेकलेस, बिलवर, देवघरातील चांदीची भांडी, मूर्ती, ताट, वाटी, १७ हजार रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. वरच्या मजल्यावर राहणारे गलांडे यांचे बंधू हेमंत गलांडे यांना आज सकाळी सुधीर यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांना चोरी झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. चोरट्याने चोरी करून जाताना बंगल्याच्या आवारात प्रात:र्विधी केला होता. चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणण्यात आले. श्वानपथक बंगल्याच्या पिछाडीस ओढ्याच्या बाजूने बोलवाड रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले. चोरटा तेथून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. घरफोडीबाबत हेमंत गलांडे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.