नेर्लेत चार एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:00+5:302020-12-06T04:29:00+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील कापूसखेड मार्गावर घाणदेवी परिसरातील चार एकर ऊस जळून खाक झाला. यात चार लाख ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील कापूसखेड मार्गावर घाणदेवी परिसरातील चार एकर ऊस जळून खाक झाला. यात चार लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत कूपनलिकेची मोटार, पाईप, वायर, फ्यूज पेटी व ठिबक पाईप जळून मोठे नुकसान झाले.
शनिवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. एकाचवेळी दोन ठिकाणी आग लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. आगीचे कारण समजू शकले नाही.
ऊसतोड सुरू असताना अचानक उभ्या उसाला आग लागली. वाऱ्यामुळे आगीचा भडका उडाला. शेतकऱ्यांनी प्रयत्न करुन आग शमवली. या घटनेनंतर काही वेळाने पूर्वेच्या बाजूला असलेल्या घाणदेवी परिसरातील उभा ऊस अचानकपणे पेटू लागला. धुराचे लोट आकाशाला भिडत होते. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. परंतु बाजूचा ऊस तुटल्यामुळे वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. जवळपास दोन एकर ऊस जळून खाक झाला. यात ठिबक सिंचनची पाईपलाईन व बोअरिंगचे साहित्य जळून खाक झाले.
सकाळी लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. भरदुपारी पेटलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी हजर झाली; परंतु रस्ता नसल्यामुळे अग्निशामक दलाची गाडी परत गेली.
कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील यांनी शेतकऱ्यांना सूचना देऊन ऊस नेण्यासाठी प्रयत्न केले. यात हणमंत रामचंद्र माने, मधुकर ऊर्फ गौरीहार मारुती माने, आनंदा केरू पाटील, कमलेश मोरे, दीपक माने या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दीपक ऊर्फ कृष्ण माने यांचे मोटर, पाईप, ठिबक जळाले.
फोटो-०५नेर्ले०२
फोटो ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथील कापूसखेड-नेर्ले रस्त्यानजीकचा ऊस अगीत जळून खाक झाला.