रस्त्याच्या वादातून ऊस जाळला
By Admin | Published: January 18, 2015 11:55 PM2015-01-18T23:55:34+5:302015-01-19T00:23:08+5:30
लिंगनूर येथील घटना : सातजणांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल
मिरज : तालुक्यातील लिंगनूर येथे रस्त्याच्या वादातून दलित शेतकऱ्यांचे ऊस पीक जाळून दोन लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी सात जणांविरुध्द दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमलिंग द्रौपदी कांबळे (रा. खटाव) या शेतकऱ्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.खटाव येथील सोमलिंग कांबळे यांनी पाच वर्षांपूर्वी लिंगनूर येथे शेतजमीन घेतली आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रात लावलेला ऊस तोडून नेण्यासाठी शेजाऱ्यांनी रस्ता अडविला होता. रस्त्याच्या वादाबाबत तहसीलदारांकडे खटला प्रलंबित असल्याने सोमलिंग कांबळे यांनी पोलीस उपअधीक्षक व प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन, उसाचे पीक काढून कारखान्याला पाठविण्यासाठी तात्पुरता रस्ता मिळवून देण्याबाबत विनंती केली. त्यानुसार पोलीस व मंडल अधिकाऱ्यांनी सोमलिंग कांबळे यांच्या शेजाऱ्यांना ऊस जाण्यासाठी तात्पुरता रस्ता देण्याबाबत सूचना दिली. मात्र त्यानंतर शनिवारी रात्री अज्ञातांनी कांबळे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला. आगीत ऊस व ठिबक संच जळाल्याने पावणेदोन लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत सोमलिंग कांबळे यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.माणिक आप्पू नाईक, प्रतीक माणिक नाईक, आनंदा नाईक, अमोल नाईक, सागर टोणे (सर्व रा. लिंगनूर) यांनी, आपल्या शेजारी दलित असू नये, मी शेती सोडून जावे, यासाठी उसाचे पीक पेटवून देऊन नुकसान केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
तात्पुरती वाटही मिळाली नाही.
सोमलिंग कांबळे यांनी पाच वर्षांपूर्वी लिंगनूर येथे जमीन घेतली आहे. मात्र या जमिनीकडे जाण्यासाठीच्या रस्त्याबाबत वाद आहे. अडीच एकरात कांबळे यांनी ऊस लावला आहे. रस्त्याच्या वादाबाबत तहसीलदारांकडे खटला प्रलंबित असल्याने सोमलिंग कांबळे यांनी पोलीस उपअधीक्षक व प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन, ऊस तोडीसाठी तात्पुरता रस्ता मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस व मंडल अधिकाऱ्यांनी सोमलिंग कांबळे यांच्या शेजाऱ्यांना ऊस जाण्यासाठी तात्पुरता रस्ता देण्याबाबत सूचना दिली. मात्र त्यानंतर शनिवारी रात्री अज्ञातांनी कांबळे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला.