म्हैसाळ जवळ कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 02:22 PM2021-12-22T14:22:15+5:302021-12-22T14:29:00+5:30
आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची दोन्ही राज्यांनी खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला.
म्हैसाळ : कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाची विटंबना झाली. या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्हत आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करत कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस-शिवसैनिकांच्यात बाचाबाची झाली.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जाऊन कर्नाटकच्या भाजप सरकारचा निषेध करण्याचे नियोजन पूर्व नियोजित होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी कडक बंदोबस्त तैन्यात केला होता. सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही ही राज्याच्या पोलीस यंत्रणा तयारीत होत्या. आंदोलकानी आंदोलनाला सुरुवात करताना पोलीस व शिवसैनिकांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसैनिकांनी कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा दहन केला.
यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! हा आवाज कोणाचा हा आवाज शिवसेनेचा या घोषणा देत परीसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी वाहतूक थोड्या काळासाठी थांबली होती. आंदोलन झाल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
यावेळी सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभुराजे काटकर, महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे, मिरज तालुका शिवसेनेचे प्रमुख विशालसिंह रजपूत, मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तानाजी सातपुते, मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, बाळासाहेब मगदूम, सतिश नलवडे, बाळासाहेब मगदूम, प्रदिप जाधव, बबन कोळी, यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर शिवसेनेच्या वतीने आंदोलन होणार असल्याने महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी यंत्रणा सज्ज ठेवते. आंदोलन स्थळी कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये यांची खबरदारी घेतली होती. आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस व कर्नाटक पोलीसांनी एकत्र येत फोटो काढला.
वाहतूक ठप्प
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्नाटक पोलीसांनी कर्नाटकातील वाहतूक तर महाराष्ट्र पोलीसांनी महाराष्ट्रातील वाहतूक काही काळ थांबवली होती. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.