शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:15 IST2025-04-18T18:13:08+5:302025-04-18T18:15:19+5:30
सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे त्या नोटीसचे दहन ...

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन नोटीसचे दहन, सांगलीत निदर्शने; ..तर हातात बंदुका घेण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या भू-संपादन हरकतीच्या नोटीस शेतकऱ्यांना बजावण्यास प्रारंभ झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीतर्फे त्या नोटीसचे दहन गुरुवारी सांगलीत करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात शंखध्वनी करण्यात आला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ, असा इशारा यावेळी समितीचे महेश खराडे यांनी दिला.
सांगलीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात आंदोलन करण्यात आले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘रद्द करा, रद्द करा शक्तिपीठ महामार्ग बंद करा’, ‘शेतकरीविरोधी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत महामार्ग करणारच, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता माधवनगर, बुधगाव, कर्नाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच आम्ही त्या नोटीसचे दहन केले. आम्ही केवळ नोटीस दहन करून थांबणार नाही. प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, पण एक इंचही जमीन देणार नाही.
खराडे म्हणाले, महामार्ग हे विकासाचे मोठे साधन आहे. यात दुमत नाही, पण जे महामार्ग गरजेचे आहेत ते करावेत. त्याला आमचा विरोध नाही. शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-विजापूर महामार्गाला समांतरच आहे. रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहने नाहीत. आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही. मग हा महामार्ग कशासाठी?
कोणत्याही भाविकांची यासाठी मागणी नाही. तरीही ठेकेदार आणि आमदार, खासदारांना पोसण्यासाठी हा महामार्ग होत आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. याशिवाय यात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आम्ही लढा चालू ठेवणार. यावेळी प्रवीण पाटील, उमेश एडके, रघुनाथ पाटील, भालचंद्र आंबोळे, राजेश एडके, राजेश पाटील, अधिक पाटील, विलास थोरात, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, अनिल कोकाटे, मयूर पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.