क्रांतीची धगधगती मशाल : नागनाथअण्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:23 AM2021-03-22T04:23:32+5:302021-03-22T04:23:32+5:30
वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक ...
वाळवा : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता अग्निकुंड, स्वातंत्र्यानंतर आपल्या व्यापक सामाजिक व रचनात्मक कार्यातून उभारलेल्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या "हुतात्मा पॅटर्न"ला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणाऱ्या संस्थापक क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या २२ मार्च रोजी ९ व्या स्मृतिदिनानिमित्त-------!
नागनाथअण्णा म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीवर क्रांतिकारी वाळवा तालुक्यात जन्माला आलेले एक तुफानी वजनदार आणि करारी व्यक्तिमत्त्व होय. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सातारा प्रतिसरकार याद्वारे झालेले कार्य व शौर्य वर्णन करणेस कागद आणि शाई सुद्धा कमी पडेल. त्याच नागनाथ अण्णांनी स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या नावे शिक्षण व उद्योग क्षेत्रांत जिवंत मंदिरे उभी करून, अखेरच्या क्षणांपर्यंत समाजासाठीच रचनात्मक भरीव सामाजिक कार्य केले आहे.
सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील तेरा दुष्काळी तालुक्यांना आज कृष्णेचे पाणी मिळाले आहे, त्यासाठी आटपाडी पाणी परिषदेद्वारे अण्णांनी ३० वर्षे मोठा संघर्ष केला आहे, हा सर्वश्रूत इतिहास आहे तो कुणी बदलूच शकत नाही. हुतात्मा साखर कारखाना अंगठेबहाद्दर कामगारांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर " हुतात्मा पॅटर्न " म्हणून नावारूपाला आणला आहे. जगांतील हे कितवे आश्चर्य म्हणून नोंद झाली पाहिजे ते तुम्हींच ठरवावे, ते म्हणजे त्यांनी उभारलेल्या हुतात्मा साखर कारखान्याचे ते स्वत: सभासद नाहीत. तसेच ट्रायल सिझनची मूठभर साखर चाखून कारखाना गेटच्या बाहेर पडलेले नागनाथअण्णा अखेरचा श्वास घेतला तरी कारखान्याच्या गेटच्या आत परत गेले नाहीत. नागनाथअण्णा जितके प्रेमळ तितकेच करारीपण होते. त्यांची कामे शासनदरबारी धूळ खात पडत नव्हती. जातीयवादाला त्यांनी अखेरपर्यंत थारा दिला नाही.
गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून शाळा, काॅलेज सुरू केलीत. त्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृहे व भोजन व्यवस्था केली. शेतकरी, शेतमजूर व कामगार आर्थिक सक्षम झाला पाहिजे म्हणून ऊस दराची स्पर्धाच सुरू केली. कामगारांना प्रसंगी ५० टक्केपर्यंत बोनस दिला आहे, तर खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरीच बनवली आहे. दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीच वाळव्यात खो-खो म्हणजे वाळव्याची पंढरी गौरवोद्गार काढले आहेत. धरणग्रस्तांच्यासाठी अनेक आंदोलने करून सरकारला धारेवर धरून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा या महान स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा ९वा स्मृतिदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम !