मलकापुरात महामार्गावर द बर्निंग ट्रक !
By admin | Published: March 8, 2017 11:28 PM2017-03-08T23:28:00+5:302017-03-08T23:28:00+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर थरार : चालत्या ट्रकला भीषण आग; लाखोचे नुकसान, दीड तास लेन बंद
मलकापूर : कोल्हापूरहून बारामतीकडे निघालेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने मलकापुरात महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार झाला. येथील कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत ट्रकच्या केबिनसह समोरील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे जीव वाचल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, दोन अग्निशामक बंबांच्या साह्याने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शांतीलाल रामचंद्र गावडे (वय ३९, रा. पाटस, ता. दौंड ) हे मालट्रक (एमएच ४२ टी ६९९४) मध्ये पाटस येथील तीन व्यापाऱ्यांचा कांद्याचा माल घेऊन कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूर येथे कांद्याची विक्री करून तीन व्यापाऱ्यांसह ते बुधवारी पुन्हा पाटस, ता. दौंड येथे जाण्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून निघाले होते.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मलकापूर, ता. कऱ्हाड येथील उड्डाणपुलावर आले असता ट्रकच्या केबिनमध्ये धूर येत असल्याचे चालक गावडे यांच्या निदर्शनास आले. ट्रक उड्डाणपुलावरून खाली घेऊन काय झाले ते पाहण्यासाठी ट्रक तसाच पुढे नेला. काही अंतर पार केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये शार्टसर्किटने पेट घेतला. ट्रक महामार्गाकडेला घेईपर्यंत केबिनमध्ये जाळाच्या ज्वाळा निर्माण झाल्या. चालकाने प्रसंगावधान राखत हळूहळू पेटता ट्रक पाचशे मीटरवर नेऊन थांबवला. ट्रकमधील व्यापाऱ्यांसह स्वत: सुरक्षित खाली उतरले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
ट्रक पेटल्याची माहिती झपाट्याने परिसरातील नागरिकांना समजली. जवळच असलेल्या महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली.
आगीची माहिती तत्काळ कृष्णा रुग्णालयातील व कऱ्हाड पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. दोन अग्निशामक बंबांच्या साह्याने दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
तोपर्यंत ट्रकचा समोरील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
कोल्हापूर-सातारा लेनवर हा द बर्निंग ट्रकचा थरार सुरू असल्यामुळे कऱ्हाड शहर पोलिस, महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दीड तास या लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. दीड तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. (प्रतिनिधी)
फोटोशेषणच जास्त...
चालत्या ट्रकला आग लागल्याचे समजताच महामार्गासह उपमार्गावर बघ्यांची तोबा गर्दी निर्माण झाली होती. प्रत्येकाने आपली वाहने अस्ताव्यस्त लावल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अशा घटनेवेळी मदत करण्यापेक्षा आपापल्या मोबाईलने फोटो काढण्यात धन्यता मानत होते.
ट्रकला आग लागलेल्या ठिकाणी उपमार्गाकडेला हिंदुस्थान मार्बल नावाचे दुकान आहे. या दुकानातील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक येण्यापूर्वी दोरीने कळशी बांधून पुलावर आग विझविण्यासाठी पाणी पुरवले. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.