निवडणुकीला जुंपल्या बसेस, प्रवाशी थांब्यावर ताटकळत, जिल्ह्यातील चित्र 

By अविनाश कोळी | Published: May 6, 2024 07:51 PM2024-05-06T19:51:54+5:302024-05-06T19:52:05+5:30

७३५ पैकी ३५० बसेस निवडणूक कामात

Buses lined up for elections, passengers waiting at the stop, picture of the district | निवडणुकीला जुंपल्या बसेस, प्रवाशी थांब्यावर ताटकळत, जिल्ह्यातील चित्र 

निवडणुकीला जुंपल्या बसेस, प्रवाशी थांब्यावर ताटकळत, जिल्ह्यातील चित्र 

सांगली: लोकसभा निवडणूक अंतर्गत मतदान प्रक्रियेसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण ७३५ पैकी ३५० बसेस नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे सोमवारी चाकरमानी, विद्यार्थी व सामान्य प्रवाशांना तासन तास थांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागले. खासगी वाहनधारकांनी या परिस्थितीचा फायदा घेत वाढीव भाडे घेतले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील सहा व हातकणंगले मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यात एसटी बसेससह टेम्पो ट्रॅव्हलर, जीप अशा एकूण ४९४ वाहनांचा समावेश आहे. यापैकी ३५० एसटी बसेसचा समावेश आहे. या बसेस निवडणूक कामात आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे प्रवाशांनी बस पकडण्यासाठी थांबा गाठला तर त्यांना तासनतास ताटकळत थांबावे लागले. नोकरीच्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना क्लासेसला किंवा सुटीला गावी जाणाऱ्यांना वाढीव भाडे देऊन खासगी वाहनाने जावे लागले. प्रवाशांचा गोेंधळ उडाला. दिवसभर त्यांना त्रास सहन करावा लागला.

५० टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द
सोमवारी तसेच मंगळवारी मतदान दिवशीही एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही दिवसांमधील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारीही प्रवाशांना बस अभावी त्रास सहन करावा लागणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय बसेस नियुक्त

  • मिरज ४७
  • सांगली ५०
  • इस्लामपूर ३७
  • शिराळा ५१
  • पलूस-कडेगाव ३९
  • खानापूर ४९
  • तासगाव-क. महांकाळ ३७
  • जत ४०

बुधवारपासून सुरळीत
बुधवारी ८ मे पासून एसटी बससेवा सुरळीत होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्या पुन्हा सुरु राहणार आहेत. सध्या सुटीचा काळ असल्याने पर्यटनापासून गावी जाण्यासाठी एसटी बसेसना गर्दी होत आहे. याच काळात मतदान प्रक्रियेत बसेस गुंतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

दोन दिवस मतदानात बसेस गुंतल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. याबाबतची पूर्वकल्पना आम्ही नोटीस प्रसिद्धीपत्रकातून प्रवाशांना दिली होती. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारपासून सर्व सेवा व फेऱ्या सुरळीत होतील. - सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली

Web Title: Buses lined up for elections, passengers waiting at the stop, picture of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली