शिराळा पश्चिम भागात व्यवसाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:47+5:302021-04-08T04:26:47+5:30
कोकरुड : शिराळा पश्चिम भागातील किराणा, औषधे, भाजीपाला यांसारखी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्यात आले ...
कोकरुड : शिराळा पश्चिम भागातील किराणा, औषधे, भाजीपाला यांसारखी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. कोकरुड येथील आठवडी बाजारचा दिवस असूनही पेठेत शुकशुकाट होता. मात्र साखरपुडे, विवाह यामुळे रस्त्यावरील वाहने, प्रवाशांची संख्या मोठी होती. परंतु व्यवसाय बंद झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात कोकरुड, शेडगेवाडी, चरण, आरळा या प्रमुख बाजारपेठा आहेत, तर मांगरुळ, बिळाशी, येळापूर, पणुंब्रे वारुण, करुंगली, मणदूर ही गावे लोकसंख्येने मोठी गावे आहेत. बुधवारी शेडगेवाडी फाटा येथील किराणा मालाचीही दुकाने बंद होती. तसेच इतर सर्व ठिकाणच्या बाजारपेठेतील किराणा, औषध दुकाने, रुग्णालये, बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालये वगळता सर्व लहान-मोठे व्यवसाय बंद होते.
कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी गेले तीन दिवस कोकरुड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व मोठ्या गावांना भेटी देऊन, जमावबंदी आणि संचारबंदीबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्या आवाहनास पाठिंबा देत व्यापाऱ्यांनी सर्व बाजारपेठा आणि मोठ्या गावातील व्यवसाय बंद ठेवले होते. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात साखरपुडे, लग्न समारंभ असल्याने सर्व रस्त्यांवर प्रवासी वाहने, लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत होती.