चुकीच्या गतिरोधकामुळे उद्योजकाचा बळी, सांगलीतील घटना
By शीतल पाटील | Published: October 16, 2023 01:50 PM2023-10-16T13:50:16+5:302023-10-16T13:50:44+5:30
अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सांगली : शहरातील अप्पासाहेब बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेल्या चुकीच्या गतिरोधकामुळे शहरातील एका उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा बळी गेला. विजय रामाप्पा मगदूम (वय ५५ मूूळ गाव वाळवा सध्या रा. कॉलेज कॉर्नर, सांगली) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. यात गतिरोधकावर दुचाकी जोरात आदळल्याने तोल जाऊन खाली पडल्यानंतर डोक्याला मार लागल्याने मगदूम यांचा मृत्यू झाला.
मृत मगदूम हे कॉलेज कॉर्नर परिसरातील विपुल प्लाझा या अपार्टमेंटमध्ये राहण्यास होते. व्यवसायाबरोबरच एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करत होते. यासह इतरही सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असे. शनिवारी रात्री आपल्या मोपेडवरून बापट मळा परिसरात कामानिमित्त गेले होते. तेथून ते घरी परतत असताना बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेला गतिरोधक त्यांना दिसला नाही. यामुळे दुचाकी गतिरोधकावरून जोरात आदळून पुढे गेली.
यातच तोल गेल्याने ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज आल्यानंतर परिसरात असलेल्या सुरक्षारक्षक व काही तरुण मदतीसाठी तिथे आले. गंभीर जखमी अवस्थेत मगदूम यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले.
शहरातील उपनगरामध्ये कोणत्याही नियमांचे पालन न करता गतिरोधक करण्यात आले आहेत. यावर कोणत्याही प्रकारचे पांढरे पट्टे नसतात. त्यामुळे वाहनधारकांना ते दिसून येत नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या गतिरोधकामुळेच हा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला.
अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
शहरातील सामाजिक उपक्रमात मगदूम यांचा सहभाग असे. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच त्यांचे सहकारी दाखल झाले. बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेल्या एका सीसीटीव्हीमध्येही हा अपघात चित्रीत झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. समाजमाध्यमावरही नागरिकांनी चुकीच्या गतिरोधकाबद्दल संताप व्यक्त केला.