व्यापाऱ्यांनो, पालिकेच्या सहनशक्तीचा अंत नको!
By admin | Published: July 2, 2015 11:31 PM2015-07-02T23:31:34+5:302015-07-02T23:31:34+5:30
संजयकाका पाटील : एलबीटीचा तिढा
सांगली : राज्य शासन व महापालिकेने एलबीटीसंदर्भात व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता ३१ जुलैपूर्वी एलबीटीची थकबाकी भरावी. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईत कोणीच हस्तक्षेप करणार नाही, असा गर्भित इशारा खासदार संजय पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिला. यासंदर्भात सोमवारी व्यापारी व महापालिका पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन थकबाकी भरण्याबाबत विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप सरकारने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द होणार आहे. तत्पूर्वी ३१ जुलैपर्यंत थकित एलबीटी भरण्याची मुदत दिली आहे. या काळात दंड व व्याज माफीची घोषणा करताना अभय योजनाही लागू केली आहे. त्याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेतला पाहिजे.
व्यापाऱ्यांच्या उपोषण आंदोलनावेळी महापालिकेने काढलेल्या तोडग्यानुसार थकित एलबीटी भरण्याची आवश्यकता होती. अभय योजनेची मुदत संपल्यानंतर महापालिकेकडून कारवाई होऊ शकते. त्यातून निष्कारण वाद वाढणार आहे. महापालिकेच्या सहनशक्तीचा अंत पाहता कामा नये. व्यापाऱ्यांना थकित एलबीटी भरावाच लागणार आहे. त्यात कुठेही सूट मिळणार नाही. व्यापाऱ्यांना याच शहरात राहून व्यापार करावा लागणार आहे. तसेच त्यांच्या करातूनच नागरिकांना सोयी-सुविधा मिळतात. (प्रतिनिधी)
सोमवारी बैठक
थकित एलबीटीसंदर्भात खा. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहे. यावेळी एलबीटी भरण्याची विनंती व्यापाऱ्यांना करू, असेही पाटील यांनी सांगितले.