मोतीबिंदू असलेल्या स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:28 PM2020-12-11T17:28:15+5:302020-12-11T17:30:46+5:30

Sangli, hospital, Medical सांगलीत लायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया करुन हे मळभ दूर केले, त्यामुळे स्वराच्या आयुष्यात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली. ​​​​​​​

Butterflies bloom again in the life of a cataract-ridden voice | मोतीबिंदू असलेल्या स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

मोतीबिंदू असलेल्या स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

googlenewsNext
ठळक मुद्देजन्मत:च दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू स्वराच्या आयुष्यात पुन्हा फुलली फुलपाखरे

सांगली : कोल्हापुरातल्या भारमल कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी इवल्या-इवल्या पावलांनी स्वराचा प्रवेश झाला. तिच्या आगमनाने भारमल दांपत्य हर्षोल्हासात न्हाले, पण हा उल्हास अल्पजीवी ठरला. पंधरा दिवसांतच स्वराच्या डोळ्यांसमोर अंध:काराचे ढग दाटू लागले. सांगलीत लायन्स रुग्णालयातील डॉक्टरांनी जोखमीची शस्त्रक्रिया करुन हे मळभ दूर केले, त्यामुळे स्वराच्या आयुष्यात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरे बागडू लागली.

कोल्हापुरातील किराणा व्यावसायिक भारमल कुटुंबाची ही कहाणी. इवल्याशा स्वराची बुब्बुळे एका जागी स्थिर राहत नसल्याचे आईच्या ध्यानी आले. रुग्णालयात तपासणीअंती स्वराच्या दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू निष्पन्न झाला. यामुळे भारमल दांपत्य हादरले. कोल्हापुरातच काही ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले, पण खर्च आवाक्याबाहेरचा होता.

सांगलीत घनश्यामनगरमधील लायन्स क्लबच्या श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन नेत्र रुग्णालयाचा संदर्भ त्यांना मिळाला. डॉ. स्वप्नाली बंडगर, चिदानंद हलपन्नावर, डॉ. बी. एन. पाटील व सहकार्यांनी यशस्वी शस्त्रक्रियेची हमी दिली. नुकतीच ती झालीदेखील. पहिल्यांदा एका डोळ्याची व पंधरवड्यानंतर दुसर्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. दोहोतील मोतीबंदू काढून टाकले.

डॉ. बंडगर, हलपन्नावर यांनी सांगितले की, इतक्या अल्प वयातील अर्भकावर रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया झाली. यापूर्वीची अर्भके आठ ते दहा महिन्यांची होती. स्वराच्या डोळ्यांत रंग भरण्यात आम्ही यशस्वी झालो.

बुब्बुळांची चंचलता, मोतीबिंदूची निश्चितता

अर्भकांचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना पटकन प्रतिसाद देतात, पण स्वराची नजर तशी नसल्याचे आईच्या लक्षात आले. आता शस्त्रक्रियेनंतर स्वराचे डोळे प्रकाश किंवा हालचालींना त्वरीत प्रतिसाद देऊ लागले आहेत.

जनुकीय दोषाची शक्यता

प्रशासकीय अधिकारी राधिका सूर्यवंशी यांनी सांगितले की, दहा टक्के बाळांमध्ये जन्मत: मोतीबिंदुची शक्यता असते. जनुकीय दोष किंवा वंशपरंपरेने विकार होतो. स्वराच्या आईलादेखील हा विकार आहे, पण लहानपणी तिच्या डोळ्यांतील मोतीबिंदुवर योग्य उपचार मिळाले नसावेत. तिच्या माध्यमातूनच स्वरालाही मोतीबिंदू झाल्याची शक्यता आहे.

Web Title: Butterflies bloom again in the life of a cataract-ridden voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.