Sangli: कुटुंब रंगले मुलीच्या विवाहात..चोरट्यांनी २८ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास
By घनशाम नवाथे | Published: February 8, 2024 11:28 AM2024-02-08T11:28:49+5:302024-02-08T11:30:17+5:30
सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीतील व्यापारी विनोद श्रीचंद खत्री (वय ४४) यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने रोख ...
सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीतील व्यापारी विनोद श्रीचंद खत्री (वय ४४) यांचा बंद बंगला फोडून चोरट्याने रोख २० लाख आणि सोन्याचे दागिने असा २८ लाख ५२ हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. खत्री कुटुंबिय मुलीच्या विवाहासाठी गेले असता चोरट्याने तिजोरी साफ केली. तत्पूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कट केल्यामुळे माहितगार व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यापारी विनोद खत्री यांचे सांगलीत मारूती रस्त्यावर शोरूम आहे. खत्री यांच्या मुलीचा विवाह असल्यामुळे सांगलीतील बंगल्यातील धार्मिक कार्यक्रम आटोपून सर्वजण सोमवारी दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथे गेले. त्यानंतर चोरट्याने रात्रीच्या सुमारास बंगल्याच्या मागील बाजूस प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती असल्यामुळे त्याने तेथील वायरिंग कट केले. त्यानंतर पाठीमागील दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला.
आतमध्ये आल्यानंतर बेडरूममधील तिजोरी फोडून आतील रोख २० लाख रूपये, सोन्याचे दागिने असा ऐवज घेतला. बंगल्यातील सर्व खोल्यामध्ये जाऊन साहित्य विस्कटून चोरट्याने रोकड व दागिने शोधले. चोरट्याचा बंगल्यात बराच काळ मुक्काम होता. रोकड व साहित्य घेऊन चोरट पळून गेला. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास खत्री कुटुंबिय सांगलीत आले. मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा आतील साहित्य विस्कटून टाकल्याचे पाहून धक्का बसला. चोरट्यांनी बेडरूममधील तिजोरी फोडून रोकड व दागिने लांबवले. त्यांनी तत्काळ सांगली शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकाला पाचारण केेले. श्वान परिसरातच घुटमळल्यामुळे चोरट्यांचा माग कळाला नाही. नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक महादेव पोवार आदींनी घटनास्थळी पाहणी केली.
सीसीटीव्ही फुटेज हाती
चोरट्याने एका सीसीटीव्हीची वायर कापली असली तरी परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने फुटेज तपासून शोध सुरू आहे.
पथके रवाना
चोरट्याचा माग काढण्यासाठी सांगली शहर पोलिस ठाण्याकडील तसेच गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आले आहे.
‘बंगल्याची माहिती असणाऱ्याने चोरी केल्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. चोरटा लवकरच पकडला जाईल. -संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली