Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण
By अशोक डोंबाळे | Published: February 16, 2024 05:01 PM2024-02-16T17:01:53+5:302024-02-16T17:03:07+5:30
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली
सांगली : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले.
आमदार अनिल बाबर यांचे ३१ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते. या रिक्त जागेवर निवडणूक होणार की नाही, याबाबत उलट-सुलट चर्चा रंगली होती. अशातच केंद्रिय निवडणूक आयोगाकडून खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना, मतदार संख्या, केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली.
पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
सुहास बाबर यांच्या नावाची चर्चा
अनिल बाबर त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे. सुहास बाबर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे, बाबर यांच्या राजकीय वाटचालीत सुहास बाबर अग्रेसर होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुहास बाबर यांना संधी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.