शक्तिपीठ महामार्गातून नृसिंहवाडी, आदमापूर, पन्हाळा, सांगलीसाठी उपमार्ग
By संतोष भिसे | Published: February 24, 2024 06:21 PM2024-02-24T18:21:03+5:302024-02-24T18:21:23+5:30
भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता
संतोष भिसे
सांगली : नागपूर ते गोवा या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाद्वारे अनेक धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. यामध्ये नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त देवस्थानाचाही समावेश आहे. त्याच्यासाठी मुख्य महामार्गातून उपमार्ग काढण्यात येणार आहे. महामार्गाच्या अंतिम आराखड्याला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्याचे रेखांकन जाहीर झाले आहे.
पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होणाऱ्या या महामार्गाद्वारे माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची अंबाबाई, पत्रादेवी ही देवस्थाने प्रामुख्याने जोडली जाणार आहेत. अर्थात, ती महामार्गावरच असल्याने स्वतंत्र उपमार्गांची आवश्यकता नाही. नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान, आदमापूरचे संत बाळूमामा देवस्थान, ऐतिहासिक पन्हाळा यांच्यासाठी मात्र उपमार्ग काढले जाणार आहेत. सांगली, गारगोटी, पट्टणकोडोली, कोल्हापूर बायपास यांच्यासाठीही उपमार्गांचे नियोजन आहे.
हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. तेथील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी या उपमार्गांची आखणी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात या महामार्गाची लांबी ५७ किलोमीटर, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२३ किलोमीटर असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ किलोमीटर असणार आहे. सांगलीनजीकच्या कर्नाळ, पद्माळे, बुधगाव, कवलापूर, सांगलीवाडी या गावांमधून महामार्ग जाईल. तेथून सांगली शहरासाठी उपमार्ग निघेल.
सांगली जिल्ह्यात बाणुरगड (ता. खानापूर) येथे तो प्रवेश करेल. तेथून तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी(ता. तासगाव) असा प्रवेश करेल. मतकुणकीमधून मिरज तालुक्यात प्रवेश करेल. कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी असा जाईल. यातील काही गावांत महामार्गासाठी चिन्हांकनाची कामे सुरू झाली आहेत.
२०२७ चे उद्दिष्ट
हा महामार्ग २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे महामार्ग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. सहा पदरी महामार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आदींचा समावेश आहे. ठिकठिकाणी पथकर नाकेदेखील असतील. सुमारे ८०५ किलोमीटर लांबीचा हा महामार्गा समृद्धीपेक्षाही लांब अंतराचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा असेल.
भूसंपादनामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता
महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यानुसार सांगली जिल्ह्यातील बहुतांश बागायती क्षेत्रातून तो जाणार आहे. शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षांच्या कष्टाने फुलविलेल्या बागायती महामार्गासाठी घेतल्या जाणार आहेत. मात्र, भूसंपादनाच्या भरपाईविषयी अनिश्चितता असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. नव्या कायदेशीर तरतुदीनुसार मूल्यांकनाचे दर शासनाने कमी केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत.