मराठा मोर्चाची उद्या जिल्हा ‘बंद’ची हाक
By admin | Published: January 9, 2017 12:06 AM2017-01-09T00:06:32+5:302017-01-09T00:06:32+5:30
माळवाडीतील मुलीचा खून : सांगलीत आज कॅँडल मार्च; संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी
सांगली : माळवाडी (ता. पलूस) येथील १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी १० जानेवारीला जिल्हा ‘बंद’ची हाक दिली आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी सांगलीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. याचदिवशी सायंकाळी स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून कॅँडल मार्च काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, विलास देसाई, श्रीकांत शिंदे, श्रीरंग पाटील, आशा पाटील, कविता बोंद्रे, उषा पाटील, रेवती पाटील, अमृता बोंद्रे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संजय पाटील म्हणाले, माळवाडीतील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मराठा क्रांती मोर्चा या घटनेचा निषेध करीत आहे. घटना उघडकीस आल्यानंतर संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माळवाडीला धाव घेतली होती. शासकीय रुग्णालयात मुलीचा मृतदेह विच्छेदन तपासणीला आणल्यानंतरही महिला पदाधिकारी तेथे गेल्या होत्या. या गुन्ह्यातील संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा, या मागणीसाठी १० जानेवारीला जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे.
ते म्हणाले, कोपर्डी प्रकरणाची आपल्या जिल्ह्यात पुनरावृत्ती झाली आहे. अशा घटना यापुढे घडू नये, यासाठी पोलिसांनी योग्यप्रकारे तपास करावा. संशयितांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी साक्षीदार व पुरावे गोळा करावेत. मंगळवारचा ‘बंद’ शांततेत पार पाडला जाईल. सकाळी अकरा वाजता सर्व पदाधिकारी शहरात फेरी काढून सर्वांना ‘बंद’चे आवाहन करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना पाच महिला पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ निवेदन देणार आहे. ‘बंद’मध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजता स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून कॅँडल मार्च काढला जाणार आहे. राजवाडा चौक, महापालिकेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कँडल मार्चची सांगता केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
घटनेचा निषेध : तासगावात कडकडीत बंद
तासगाव : पलूस तालुक्यातील माळवाडी येथील घटनेबद्दल जिल्हाभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी तसेच घटनेचा निषेध म्हणून शेतकरी कामगार पक्ष, शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवारी तासगाव बंद पुकारला होता. नागरिकांनीही या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. माळवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा प्रवृत्तींना कुठेही पोलिस प्रशासनाची जरब दिसून येत नाही. तरी हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवावा, शासनाने या मुलीच्या घरच्यांना आर्थिक मदत करावी, अशा प्रकरणांवर कडक शिक्षेची तरतूद करावी यांसह विविध मागण्या करीत तासगाव बंदची हाक देण्यात आली होती.
व्यापाऱ्यांसह, नागरिकांनी बंदला पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे तासगावच्या बाजारपेठांत शुकशुकाट होता. तसेच तालुक्यातील मणेराजुरी आणि बस्तवडेसह काही ठिकाणीही बंद पाळून माळवाडीतील घटनेचा निषेध करण्यात आला.
पदाधिकाऱ्यांची आज बैठक
डॉ. संजय पाटील म्हणाले, मंगळवारच्या ‘बंद’चे जिल्ह्यातील नियोजन करण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता संघटनेच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये यांनाही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.
माळवाडीचा खटला जलदगती न्यायालयात चालविला माळवाडी (ता. पलूस) येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा अमानुषपणे खून केल्याची घटना गंभीर व निंदनीय आहे. संशयितांना पोलिस लवकरच अटक करतील. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल व याचा वर्षभरात निकाल लागेल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
रहाटकर म्हणाल्या की, माळवाडीत दोन दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या घटनेची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. माळवाडीत रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. पीडित मुलीच्या नातेवाईकांची तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांनी माहिती घेतली. पोलिसांचा तपास योग्यप्रकारे सुरु आहे. काही संशयित ताब्यात आहेत. पण अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. संशयितांकडे चौकशी केली जात आहे. संशयितांचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. पालकांना चिंता वाटावी अशीच ही घटना घडली आहे. पोलिस मुळापर्यंत जाऊन तपास करुन याचा निश्चितपणे छडा लावतील. सर्व मुद्यांना धरुन तपास सुरु आहे. राज्यात अशाप्रकरच्या घटना वाढत असल्याने, ही एक चिंतेची बाब बनली आहे. अशा गुन्ह्यातील संशयितांना कडक शासन झाले, तरच कायदा काय असतो, हे त्यांना समजेल. त्यामुळे भविष्यात असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.
रहाटकर म्हणाल्या की, काही समाजकंटक सोशल मीडियावरुन अफवा पसरवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिस अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेत आहेत. भिलवडी पोलिस ठाण्यात मुलीचा खून, बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासाचा आढावा घेतला जाईल. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)