विधिमंडळाचे अधिवेशन बोलवा
By admin | Published: April 28, 2017 12:49 AM2017-04-28T00:49:54+5:302017-04-28T00:49:54+5:30
पृथ्वीराज चव्हाण : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर
२ मे रोजी राज्यपालांना शिष्टमंडळ भेटणार
कऱ्हाड : ‘महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशपेक्षा श्रीमंत राज्य आहे. जर उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असेल तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी शेती प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आम्हा सर्व विरोधकांची मागणी आहे. यासंदर्भात येत्या २ मे रोजी शिष्टमंडळासह राज्यपालांना भेटणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील वेणूताई चव्हाण ट्रस्टमध्ये संघर्ष यात्रेनिमित्त कऱ्हाडात आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आरपीआयचे जोगेंद्र कवाडे, आमदार अबू आझमी, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आनंदराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर अनेक आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो, हमीभाव देतो, तुरीच्या शेवटच्या कणापर्यंत खरेदी करतो ही त्यापैकीच काही आश्वासने आहेत. मात्र, ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, पाळली जात नाहीत म्हणूनच आम्हाला संघर्ष यात्रा काढावी लागली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारच्या कालावधीत सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मात्र, आम्ही सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाग पाडू.’
सुनील तटकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी १०५ जवानांना बलिदान द्यावे लागले. मात्र, आज पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वी विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्या व्हायच्या. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही आत्महत्येचे लोण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. तूर खरेदीवरून शेतकरी अडचणीत आला असून, योग्य भाव शेतकऱ्यांच्या हातात पडलाच पाहिजे, असे सांगत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोलचा दर जास्त आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून महागाई वाढत आहे.’
जोगेंद्र कवाडे म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बजेट मांडले जात असताना या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख आहे का? आणि असेल तर किती कर्जमाफी केली? एवढे आधी सांगा, अशी आम्ही विरोधकांनी मागणी केली. मात्र, त्याचे फळ म्हणून १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. सभागृहात न्याय मिळत नाही म्हणून या विश्वासघातकी सरकारला जाब विचारण्यासाठी ही संघर्ष यात्रा आम्हाला काढावी लागली आहे. बुलेट ट्रेनसाठी, समृद्धी मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे शेतकऱ्यांना ३० हजार ५०० कोटींची कर्जमाफी करायला पैसे नाहीत, ही बाब दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या या सरकारला धडा शिकविण्यासाठी या संघर्ष यात्रेत लोकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अजित पवार म्हणाले, ‘राजकारण करण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आलेली नाही. तर आम्हाला अडचणीतील शेतकऱ्याला बाहेर काढायचे आहे. म्हणून ही यात्रा काढली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती जरी आरोप केले तरी त्या आरोपांना जनता थारा देणार नाही, असे सांगतच शरद पवारांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत छेडले असता शरद पवार यांनी यावर नुकतेच उत्तर दिले आहे. मी त्यावर बोलणे उचित नाही,’ असे अजित पवार म्हणाले.
नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, याबाबत अजित पवारांना विचारले असता, ‘खरंतर याबाबतीत राणेंना विचारले तर बरे होईल,’ असे अजित पवार म्हणाले. तसेच माझी अद्याप त्यांच्याशी भेट झाली नाही. भेट झाली की तुमचा प्रश्न मी त्यांना आवर्जून विचारेन. त्यांनी दिलेले उत्तरही तुमच्यापर्यंत पोहोचवू, असे मिश्कील उत्तर पवारांनी दिले.
एकटा जीव अन् सदाशिव
आमदार बच्चू कडू-पाटील हे सत्ताधाऱ्यांबरोबर पाठीमागच्या सरकारवरही टीका करीत आहेत, याबाबत विचारले असता ‘बच्चू कडू-पाटील यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्या माध्यमातून मतदारसंघात मोठी कामे करून घेतली आहेत. आता सहानुभूती मिळविण्यासाठी ते काय बोलत असतील हे मला माहीत नाही; पण त्यांचा एकटा जीव सदाशिव आहे. त्यांच्यासोबत दुसरे कोणीही नाही,’ असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.
सदाभाऊंना वाण आणि गुणही लागला
‘शेतकरी संघटनेचे नेते आता सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी आहेत. सदाभाऊ तर आता जवळजवळ भाजपवासी झाले आहेत. त्यांना वाण नाही तर गुण लागतो, या म्हणीप्रमाणे गुण आणि वाणही लागल्याचे दिसत असून, सत्तेत असण्यापूर्वीची त्यांची वक्तव्ये आणि आत्ताची वक्तव्ये यामध्ये मोठा फरक पडला असून, शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून कोसो दूर गेले आहेत,’ अशी टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली.