‘स्वाभिमानी’ची रविवारी जिल्हा ‘बंद’ची हाक : ऊसदर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:11 PM2018-11-09T23:11:45+5:302018-11-09T23:16:25+5:30
एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको
सांगली : एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, तीन तुकड्यात एफआरपी देण्याचा जो घाट घातला जात आहे, त्याला आमचा विरोध आहे. याचे पडसाद आंदोलनात उमटलेले दिसतील. जिल्ह्यातील शेतकºयांनी गाव बंद ठेवून शेजारच्या राज्य किंवा मुख्य मार्गावर होणाºया रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे. गाव बंद, उसाची तोड बंद करुन शेतकºयांनी आंदोलनात सक्रिय व्हावे.
ते म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने बंद ठेवण्यात आले. मात्र सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखाना बंद ठेवला नाही. या कारखानदारांना जिल्ह्यातील एका मंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्याच्या पाठबळामुळे पोलीसही दंडुक्याच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आम्ही त्याला भीक घालत नाही. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, तेवढा उद्रेक होईल, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सांगली, इस्लामपूर, तासगाव व शिराळा ही शहरे बंद ठेवून व्यापाºयांनी सहकार्य करावे.
आंदोलनाची ठिकाणे...
रविवारी सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, पद्माळे फाटा, नांद्रे, कवठेएकंद, शिरढोण, पाचवा मैल, वसगडे, पलूस, अंकलखोप फाटा, म्हैसाळ उड्डाण पूल, आष्टा, वाळवा फाटा, इस्लामपूर, ताकारी, बहे, किल्लेमच्छिंद्रगड लाडेगाव फाटा, रेठरेधरण आणि जत या ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. आंदोलनातून अत्यावश्यक सेवा वगळ्ण्यात आल्या आहेत.