वारकरी म्हणून आले आणि वारकऱ्यांचेच दागिने लुटले, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 16:55 IST2023-06-24T16:55:15+5:302023-06-24T16:55:35+5:30
पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रार घेण्यास विलंब केला. दरम्यान, दिंडी पुढे गेल्याने वारकरी तक्रार न देताच निघून गेले

वारकरी म्हणून आले आणि वारकऱ्यांचेच दागिने लुटले, सांगलीतील घटना
जत : आपणही वारकरी असल्याचे सांगत आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसलेल्या तिघांनी महिलेचे सव्वा तोळे सोन्याचे गंठण व रोख दोन हजार रुपये घेऊन धूम ठोकली. ही घटना जतजवळ यल्लमा देवी मंदिराच्या परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली.
आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. कर्नाटकातून आलेली दिंडी गुरुवारी जत येथील श्री यलम्मा देवी मंदिराजवळ मुक्कामास होती. त्यावेळी एक वयस्कर व्यक्ती व दोन तरुण तेथे आले. आपणही वारकरी असून पंढरपूरला निघाल्याचे सांगत त्यांनी दिंडीसाेबत मुक्काम केला.
शुक्रवारी सकाळी वारकरी आंघोळी करत असताना तिघांनी एका महिलेचे सव्वा तोळे साेन्याचे गंठण, रोख दोन हजार रुपये घेऊन बिळूर रस्त्याकडे पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर वारकरी जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. मात्र, पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रार घेण्यास विलंब केला. दरम्यान, दिंडी पुढे गेल्याने वारकरी तक्रार न देताच निघून गेले. त्यामुळे या घटनेची रात्री उशिरापर्यंत पाेलिसात नोंद नव्हती.