मुंजीसाठी आले आणि भारतातच अडकले ; सांगलीतील कुटुंबाची कोरोनाने केली ताटातूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:02 PM2020-03-20T18:02:22+5:302020-03-20T18:04:46+5:30
पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती दिसतात.
सांगली : मुलाच्या मुंजीसाठी हाँगकाँगहून आलेले एक कुटुंब कोरोनामुळे भारतातच अडकून पडले. कुटुंबप्रमुख परतले, पण पत्नी आणि मुले कोरोनाची साथ ओसरण्याची वाट पाहत आहेत.
पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकोनी कुटुंब सहा वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहते. पतीच्या नोकरीमुळे सारेच हाँगकाँगवासी झालेत. ते राहत असलेले शहर चीनच्या अगदी सीमेलगत आहे. त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे राहिले तरी चीनच्या शेनझेन शहरातील इमारती दिसतात. डिसेंबर महिन्यात मुलाच्या मुंजीसाठी सारे भारतात आले. जानेवारीअखेरीस मुंजीचा सोहळा साग्रसंगीत पार पडला. २२ फेब्रुवारीपर्यंत सर्वजण एकत्र थांबले. एवढ्यात जगभर कोरोनाने हात-पाय पसरायला सुरुवात केली. ड्युटीवर हजर होणे गरजेचे असल्याने कुटुंबप्रमुख निघून गेले व पत्नी आणि दोन मुले मात्र येथेच राहिली.
२० एप्रिलपासून हाँगकाँगमध्ये मुलांची शाळा सुरू होतेय. त्याअनुषंगाने १० एप्रिलचे विमानाचे तिकीट आरक्षित केले आहे. पण कोरोनाची स्थिती कशी राहते, यावर विमान उड्डाण अवलंबून आहे. २२ मार्चपासून भारताने सर्वच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध घातले आहेत. परिस्थिती सावरली नाही, तर ती लांबू शकतात. हाँगकाँगमध्येही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काटेकोर नियम लागू केलेले असल्याने, तेथील प्रवेशही तितकासा सुकर राहिलेला नाही. शाळा-महाविद्यालये, बगीचे बंद आहेत. वर्क फ्रॉम होमची तंतोतंत अंमलबजावणी सुरु आहे. अशा स्थितीत भारतातच तूर्त सुरक्षित असल्याची या कुटुंबाची भावना आहे.
भारतातही हाँगकाँगसारखीच परिस्थितीची हाताळणी
सहा वर्षांपासून हाँगकाँँगमध्ये राहिल्याने तेथील प्रशासकीय व्यवस्था जवळून पाहिलेल्या या कुटुंबाने भारतातील कोरोना युद्धाचेही कौतुक केले. देशात कोरोनासंदर्भात गतीने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे सव्वा अब्ज लोकसंख्येच्या देशातही कोरोनाने हाहाकार माजला नाही. लोकांनाही त्याचे गांभीर्य समजले आहे. हाँगकाँगच्या धर्तीवरच भारतानेही कोरोनाविरोधात मोहीम राबविल्याचे निरीक्षण या कुटुंबाने नोंदविले.