लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:35 PM2020-05-15T22:35:45+5:302020-05-15T22:37:12+5:30
घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.
संतोष भिसे ।
सांगली : लांबलेल्या लॉकडाऊनमध्ये घरात सक्तीने कोंडून घ्यावे लागल्याने प्रत्येकजण मेटाकुटीला आला आहे. पण कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने लॉकडाऊन सांभाळतानाच ते सुसह्य ठरावे यासाठी ‘तिरंगी पास’चा पॅटर्न वापरला. त्यातून ग्रामस्थांची कोंडमाऱ्यातून सुटका तर झालीच, शिवाय व्यापारउदीमही सुरू राहिला.
२५ एप्रिलरोजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधित बफर झोन निश्चित केले. दैनंदिन व्यवहारांसाठी फक्त बफर झोनमधील रहिवाशांना परवानगी दिली. गावाची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. सर्वजणएकाचवेळी बाहेर पडले तर, लॉकडाऊनचा फज्जा उडेल, हे लक्षात घेऊन तिरंगी पासचे नियोजन केले. या क्लृप्तीमुळे गर्दीवर नियंत्रण आले. दररोज फक्त हजारभर लोकच रस्त्यावर येत राहिले. अत्यावश्यकदुकाने दररोजच उघडी राहिल्याने ग्रामस्थही निर्धास्त राहिले. लॉकडाऊनसोबतच लोकांची दैनंदिनीही सुरू राहिली. घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.
या नियोजनामुळे महामार्गालगत असूनही कामेरी गाव कोरोनाच्या फैलावापासून दूर राहिले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच स्वप्नाली जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, डॉ. साकेत पाटील, सुनंदा पाटील, सुनील पाटील, दि. बा. पाटील, दिनेश जाधव, नंदकुमार पाटील, रणजित पाटील, जयराज पाटील, के शव पाटील, ग्रामसेवक आनंदराव चव्हाण, तानाजी माने, विजय जाधव आदींच्या संकल्पनेतून पॅटर्न राबवला.
अशी झाली अंमलबजावणी
ग्रामपंचायतीने पिवळा, गुलाबी व निळ््या रंगांचे तीन हजार पास छापले. घरटी एक दिला. पिवळ््या पासधारकांना सोमवारी व गुरुवारी बाहेर पडण्याची परवानगी दिली. गुलाबी पासधारकांना मंगळवारी, शुक्रवारी, तर निळ््या पासधारकांना बुधवारी, शनिवारी परवानगी दिली. रविवारी संपूर्ण संचारबंदी ठेवली. याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे अत्यावश्यक कामापुरतेच व मर्यादित संख्येने ग्रामस्थ बाहेर आले.
शंभर टक्के लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊन अर्थचक्रही थंडावणार होते. हे लक्षात घेऊन तीनरंगी पासचा पॅटर्न वापरला. लोकांनीही प्रामाणिक अनुकरण केले. प्रसंगी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली. याचे चांगले परिणाम दिसले. - शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा