जत तालुक्यात प्रचाराचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:19 AM2021-01-10T04:19:19+5:302021-01-10T04:19:19+5:30
माडग्याळ : जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. भावी सरपंच व सदस्य होण्यासाठी उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून ...
माडग्याळ : जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. भावी सरपंच व सदस्य होण्यासाठी उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून प्रचाराला सुरुवात केली आहे. तालुक्यात ३० पैकी २९ ग्रामपंचायतींसाठी लढत होत असून, एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ३० ग्रामपंचायती बिनविरोध करा, गावच्या विकासासाठी ३० लाखांचा निधी देतो, असे आवाहन आमदार विक्रम सावंत यांनी केले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाकडे बहुतांश गावातील उमेदवारांनी पाठ फिरवली आणि निवडणूक रिंगणात अनेकांनी शड्डू ठोकला आहे.
तालुक्यातील उटगी, अंकलगी, उमराणी, वळसंग, अंकले या गावात चुरशीने प्रचार सुरू आहे. प्रमुख लढत काँग्रेस व भाजप अशीच होणार आहे. सध्या सर्वच गावात प्रचाराने वेग घेतला आहे. मतदारांच्या गाठी-भेटींवर जोर दिला असला तरी काही गावात सोशल मीडियाचाही वापर करून नेते व उमेदवार प्रचार करत आहेत.
सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर निघणार असल्याने सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवारांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची मानून तालुक्यातील नेते गावपातळीवर लक्ष ठेवून आहेत.
चाैकट
प्रशासनाचेही लक्ष
शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळू लागल्याने सरपंच पदाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जत तालुक्यात काँग्रेस व भाजपने २९ गावांतील निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. आचारसंहितेच काटेकोर पालन उमेदवार करीत असून प्रशासनही ग्रामपंचायत निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.