हॉटेल कचऱ्याचा ‘फिनिक्स’ला दिलेला ठेका रद्द

By Admin | Published: January 8, 2016 01:31 AM2016-01-08T01:31:27+5:302016-01-08T01:33:07+5:30

स्थायी समिती सभा : जाहीर निविदा काढून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा सभापतींचा आदेश; ड्रेनेज, अतिक्रमणांवर वादळी चर्चा

Canceled contract for Hotel Trash 'Phoenix' | हॉटेल कचऱ्याचा ‘फिनिक्स’ला दिलेला ठेका रद्द

हॉटेल कचऱ्याचा ‘फिनिक्स’ला दिलेला ठेका रद्द

googlenewsNext

सांगली : महापालिका हद्दीतील हॉटेल्स, खानावळी, हातगाडीवरील ओला कचरा जमा करण्याचा फिनिक्स कंपनीला दिलेला ठेका गुरुवारी स्थायी समिती सभेत रद्द करण्यात आला. जाहीर निविदा मागवून नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश सभापती संतोष पाटील यांनी प्रशासनाला दिले. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत महापालिकेने हॉटेल्स, खानावळीत असणारा ओला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी १५०, ३०० व ६०० रुपये शुल्क आकारले होते. हा कचरा उचलण्याचा ठेका फिनिक्स कंपनीला देण्यात आला होता. तसा ठराव स्थायी समितीत करण्यात आला. कंपनीने ३० वर्षांसाठी बीओटी तत्त्वावर देण्याचा घाट घातला होता. त्याला स्थायी समितीनेही ऐनवेळच्या ठरावात मान्यता दिली होती. या प्रकरणावरून महापालिकेत वादळ निर्माण झाले होते. प्रशासनाने एकाच कंपनीला ठेका देण्याचे विषयपत्र दिले होते. त्यामुळे या प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त होत होती.
गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक हारुण शिकलगार, दिलीप पाटील, शेडजी मोहिते यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. घन कचऱ्यांतर्गत हॉटेल्स, खानावळींचा ओला कचरा उचलण्याचा ठेका प्रायोगिक तत्त्वावर देण्यास विरोध नाही; पण त्यासाठी जाहीर निविदा काढावी. ठेकेदाराला अटी व शर्ती घालून ठेका द्यावा. कचरा उठावाचे दर प्रशासनाने ठरविले आहेत. ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यात आलेली नसून, त्याच्याशी करारपत्रही करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा ठेका रद्द करून जाहीर निविदा काढावी, अशी मागणी केली. तसेच या प्रकल्पासाठी महापालिका कोणतीही जागा, वीज कनेक्शन उपलब्ध करून देणार नाही, असे बंधनही घालावे, अशी मागणी केली. त्यावर सभापती पाटील यांनी, हा ठेका रद्द करून जाहीर निविदा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. स्थायी समितीचा हेतू प्रामाणिक असून आम्ही प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविणार आहोत. हा प्रकल्प बीओटी नसल्याचे यातून सिद्ध होईल, असे पाटील म्हणाले.
सांगलीवाडी व मिरज येथील ड्रेनेजचे काम बंद असल्याचे दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांनी निदर्शनास आणून दिले. सांगलीवाडीतील ड्रेनेजचे काम सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते; पण अद्यापपर्यंत काम सुरू झालेले नाही. ठेकेदार टोलवाटोलवी करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला. मिरजेतही लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांचे काम सुरू आहे. बेडग रस्त्यावर मुख्य वाहिनीचे काम सुरू झालेले नाही, असे दुर्वे यांनी सांगितले. त्यावर सोमवारपासून काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश सभापतींनी दिले. (प्रतिनिधी)ॉॉॉॉ


अमरधाममधील तीन कर्मचारी गायब
अमरधान स्मशानभूमीत चार कर्मचारी कार्यरत आहेत; पण केवळ एकच कर्मचारी काम करतो. उर्वरित
तिघेजण घरात बसून पगार घेतात, असा आरोप राजू गवळी यांनी केला.
कर्मचारी नसल्याने रक्षा चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. कर्मचारी ड्युटीवर असेल तर रक्षा चोरी कशी होते? असा सवालही त्यांनी केला.
मिरज व कुपवाड स्मशानभूमीत तर एकही कर्मचारी नाही. या प्रकाराबद्दल स्वच्छता निरीक्षकाची चौकशी करण्याची मागणी गवळी यांनी केली. त्यासंदर्भात अहवाल देण्याचे आदेश कामगार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


तोंडे बघून हातोडा
कुपवाड येथे बुधवारी अतिक्रमणे काढण्यात आली. काही अतिक्रमणांना पालिकेने हातही लावला नाही. त्याची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे सभापतींना पाठविण्यात आली होती. याबद्दल सहायक आयुक्त सी. बी. चौधरी यांना जाब विचारण्यात आला. संबंधित मालमत्ताधारकाने स्वत:हून अतिक्रमण काढून घेणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Canceled contract for Hotel Trash 'Phoenix'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.