श्वानांवरील कर आकारणी रद्द : सांगली महापालिकेत काँग्रेसची पक्षबैठक -आज शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:34 PM2018-04-19T23:34:36+5:302018-04-19T23:34:36+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात
सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर हारूण शिकलगार व गटनेते किशोर जामदार यांनी सांगितले. बचत गटाला जागा देण्यासही सत्ताधाऱ्यांनी विरोध केला आहे.
महापालिकेची सभा शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक गटनेते किशोर जामदार यांनी घेतली. बैठकीला महापौर हारूण शिकलगार यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत आला आहे. यामुळे श्वानप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी श्वानप्रेमी व श्वानमालकांनी नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर श्वानांसह मोर्चा काढला. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन अन्यायी कर रद्द करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव रद्द न झाल्यास सभेत श्वान सोडण्याचा इशाराही माने यांनी दिला होता. त्याचे पडसाद काँग्रेस बैठकीत उमटले.
निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे असले कर प्रशासनाने सुचवू नयेत. पाचशे रुपये कराचा प्रस्ताव आरोग्य विभागाचा होता. मग आयुक्तांनी पाच हजार कर का केला? असा सवाल काही नगरसेवकांनी केला. श्वान मालकांकडून कोणताही कर घेऊ नये, अशी भूमिका सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली. त्यानुसार हा विषय शुक्रवारच्या महासभेत रद्द करण्याचा निर्णय सत्ताधाºयांनी घेतला. महापालिका क्षेत्रातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालास प्रदर्शन व विक्री करण्यासाठी राजवाडा चौकातील शाळा नंबर दहाची खुली जागा देण्याचा विषय सभेत आला आहे. भविष्यात शाळेचा पट वाढल्यास सध्याची जागा अपुरी पडण्याची शक्यता असल्याने शाळेने ही जागा देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा विषय रद्द करण्यात येणार आहे.
सांगलीवाडी येथील श्री संत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांना वार्षिक २ लाख ७२ हजार किंवा मासिक २२ हजार ७२० रुपये भाडेपट्ट्याने नऊ वर्षे मुदतीने जागा देण्याचा विषय सभेत आहे. वारकरी प्रतिष्ठान असल्याने वार्षिक केवळ पन्नास हजार वार्षिक भाडे आकारण्याचा निर्णय सत्ताधाºयांनी घेतला. त्यावर महासभेत चर्चा करून विषय मंजूर करण्यात येणार आहे. अग्निशमन केंद्राजवळील खुल्या जागेवर व्यायामशाळा बांधण्यासाठी कमी भाडेपट्टीने जागा देण्यासही बैठकीत सहमती दर्शविण्यात आली.
राष्ट्रवादीचाही विरोध
महापालिका क्षेत्रातील पाळीव कुत्र्यांवर कर आकारणीस राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या पक्षबैठकीत नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. शाळा नंबर दहाजवळील जागा बचत गटाला देण्यावर सभेत चर्चा करण्याची तयारी दर्शविण्यात आली.
सांगली शहर व विस्तारित परिसरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी जागा व बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांच्या मालाची विक्री होत नाही. महासभेत राजवाडा चौकातील शाळेच्या जागेत कायमस्वरूपी सुमारे ५० स्टॉल बसतील, अशा जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जागेचा प्रश्न कायमचा सुटून मालाला योग्य भाव मिळेल.
- शेखर माने, नेते, उपमहापौर गट