Sangli: खानापूर विधानसभा मतदारसंघातून 'वंचित'कडून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 06:37 PM2024-09-21T18:37:22+5:302024-09-21T18:40:12+5:30
दिलीप मोहिते विटा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली ११ उमेदवारांची यादी ...
दिलीप मोहिते
विटा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली ११ उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली. यात खानापूरविधानसभा मतदारसंघातून नागेवाडी (ता.खानापूर) येथील ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव संग्राम कृष्णा माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीतून शिवसेनेचे सुहास बाबर, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजितदादा गटाचे अॅड. वैभव पाटील, भाजपचे ब्रम्हानंद पडळकर तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे.
महायुतीतच इच्छुक उमेदवारांची रेलचेल झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत असतानाच विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही ठरलेले नाहीत. परंतु, आता वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ११ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली.
या यादीत ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव व ओबीसी समाजासाठी सातत्याने लढा देणारे नागेवाडी येथील संग्राम माने यांना डॉ. आंबेडकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. संग्राम माने हे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत त्यांनी नागेवाडी पंचायत समिती गणातून खानापूर पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. या पंचायत समितीच्या निवडणूकीत दिवंगत माजी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या गटाचे उमेदवार बाळासाहेब नलवडे यांनी माने यांचा पराभव केला होता.
त्यानंतर त्यांनी ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला होता. माने यांनी समाजाचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. फेबु्रवारीमध्ये त्यांनी पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सामाजिक कार्याची माहिती देत खानापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली.