उमेदवारांचं कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात! : पायाला भिंगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:15 PM2019-10-15T23:15:01+5:302019-10-15T23:18:09+5:30
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर. आर. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांच्यासाठी ही पहिलीच महत्त्वाची लढत आहे. मुलगा रोहित मुख्य आघाडी सांभाळत आहे. आबांचा मुलगा म्हणून मिळणारे ग्लॅमर ताकदीने वापरुन आमदारकी पुन्हा एकदा कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
संतोष भिसे ।
सांगली : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना जिल्ह्यात उमेदवारांचे अख्खे कुटुंब पायाला भिंगरी बांधून फिरत आहे. आर्थिक व्यवहारासह महत्त्वाच्या जबाबदाºया सांभाळत आहेत.
प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. एकाचवेळी अनेक आघाड्या सांभाळाव्या लागत असल्याने उमेदवारांची कुटुंबेच मतदारांना भिडली आहेत. सांगलीत महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी पत्नी मंजिरी प्रत्येक प्रभागात संपर्क करत आहेत. भाऊ गणेशही सुकाणू सांभाळत आहेत.
प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीचे पृथ्वीराज पाटील यांच्यासाठीही संपूर्ण परिवार मैदानात उतरला आहे. पुतण्या ऋतुराज, सून प्रियांका, मेहुणे सत्यजित पवार, मुलगा वीरेंद्र यांनी मतदारसंघ पिंजला आहे.इस्लामपुरात जयंत पाटील यांच्यासाठी पत्नी शैलजा, मुले प्रतीक व राजवर्धन यांनी रान उठवले आहे. लढत तिरंगी होणार, हे निश्चित झाल्यानंतर अख्खे कुटुंब मैदानात उतरले. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहेत, त्यामुळे घरच्या आघाडीची जबाबदारी त्यांच्या कुटुंबाकडे आली आहे.
विरोधी उमेदवार नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासाठीही पत्नी सुनीता, चुलत भाऊ अजित, अमोल व अक्षय रणांगणात आहेत. महायुतीचे गौरव नायकवडी यांच्यासाठी पत्नी स्नेहल यांनी ताकद दिली आहे. चुलती जिल्हा परिषद सदस्या डॉ. सुषमा नायकवडी, चुलते वैभव हेदेखील कार्यरत आहेत. होमपीच असलेल्या वाळव्याची आघाडी सांभाळत आहेत.
लक्षवेधी लढत असलेल्या जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत पत्नी उर्मिलाताई, मुलगा पंचायत समिती सदस्य मनोज, नातू संग्राम आणि सून सविता यांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे. डॉ. रवींद्र आरळी यांच्यासोबत पत्नी डॉ. रेणुका, मुलगी ऋतुजा व भाऊ राजेंद्र महत्त्वाची सूत्रे सांभाळत आहेत. विक्रम सावंत यांना पत्नी सुषमा, बहीण नीलम, भाऊ चंद्रसेन व अभय, मामांकडील शिंदे कुटुंबियांची साथ मिळाली आहे.
आबांच्या कुटुंबासमोर : सरकारांचं कुटुंब
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर. आर. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांच्यासाठी ही पहिलीच महत्त्वाची लढत आहे. मुलगा रोहित मुख्य आघाडी सांभाळत आहे. आबांचा मुलगा म्हणून मिळणारे ग्लॅमर ताकदीने वापरुन आमदारकी पुन्हा एकदा कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याची विवाहित बहीण स्मितादेखील मदतीला आली आहे. आबांचे भाऊ सुरेश व त्यांची मुलेही रान उठवत आहेत. कोपरा सभा व प्रत्यक्ष संपर्काद्वारे आबांचा वारसा मतदारांपर्यंत नेत आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर रणांगणात उतरलेले अजितराव घोरपडे यांना मुलगा राजवर्धनची महत्त्वाची साथ आहे. शिवाय पत्नी जयमालादेवी आणि सून प्रियंकादेवीही सोबतीला आहेत.
शिराळ््यात बिग फाईटसाठी बिग फॅमिली मैदानात
शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासाठी पत्नी सुनंदा, मुले रणधीर, सत्यजित, अभिजित यांनी कंबर कसली आहे. मानसिंगराव नाईक यांच्यासोबत अख्खा नाईक परिवार खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. पत्नी सुनितादेवींसह मुलगा विराज, भाऊ राजेंद्र, अमरसिंह, भावजय मनीषादेवी, पुतण्या सम्राटसिंह, तसेच भाऊ अॅड. भगतसिंह, भाऊसाहेब मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तिसरे उमेदवार सम्राट महाडिक यांच्या मदतीला भाऊ राहुल मैदानात आहेत. शिवाय पत्नी तेजश्री, भावजय हर्षदा, मातोश्री मीनाक्षीताई यादेखील मतदारसंघात फिरत आहेत. लढत तिरंगी असल्याने प्रत्येक आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.
खानापुरात पारंपरिक चित्र
खानापूर-आटपाडीत महायुतीचे अनिल बाबर यांची प्रचारयंत्रणेची धुरा पत्नी शोभा, पुत्र सुहास, अमोल, सून शीतल व सोनिया यांनी सांभाळली आहे. अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांच्यासाठी नेहमीप्रमाणे मुले वैभव, विशाल आणि स्नुषा नगराध्यक्षा प्रतिभा यांनी आघाडी सांभाळली आहे. पत्नी जयश्रीताई आणि पुतण्या पृथ्वीराज हेसुद्धा कार्यरत आहेत.