उमेदवारांची ‘कुंडली’ आज मतदान केंद्रांवर झळकणार...
By admin | Published: February 19, 2017 11:03 PM2017-02-19T23:03:49+5:302017-02-19T23:03:49+5:30
प्रशासनाचा प्रयोग : इस्टेट, गुन्हे यांची माहिती फ्लेक्सवर लावण्यात येणार; कोण किती पाण्यात मतदानापूर्वीच कळणार
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांची ‘कुंडली’ प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने राबविलेल्या या अभिनव प्रयोगामुळे कोण किती ‘पाण्यात’ आहे, याचा प्रत्यय मतदारांनाही येणार आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. उमेदवाराची मालमत्ता, सोने, चांदी, रोकड यासह पोलिस दफ्तरी नोंद असलेले गुन्हे, विविध माध्यमातून केली गेलेली आर्थिक गुंतवणूक याची सविस्तर माहिती उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेली आहे. आतापर्यंत हा सोपस्कार असायचा, प्रतिज्ञापत्रात काय नोंदी आहेत?, याची उत्सुकता सामान्य नागरिकांना असते. मात्र, त्याची माहिती उघड केली जात नसल्याने उमेदवारांच्या अनेक बाबी ‘झाकून’ राहत होत्या. या व्यतिरिक्त संबंधित उमेदवाराकडे बेसुमार मालमत्ता असेल तर या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्यावर प्राप्तिकर व इतर विभागांनी कारवाई केलेलीही ऐकिवात नाही. मात्र, संबंधित प्रतिज्ञापत्रातील माहिती प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार असल्याने मतदारांना संबंधित उमेदवारांचे ‘मोजमाप’ करणे सोपे जाणार आहे. जिल्ह्यातील ६४ जिल्हा परिषद गटांसाठी २८९ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीच्या १२८ गणांसाठी ५३५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांची कुंडली सोमवार, दि. २० फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, या दिवशी १८ लाख ८६ हजार ५७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यामध्ये २ हजार ५८४ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर फ्लेक्सच्या माध्यमातून उमेदवारांची प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती झळकविण्यात येणार आहे. या फ्लेक्सवर उमेदवाराचे नाव, पक्ष, मालमत्ता, गुन्हे यांची माहिती असणार आहे. निवडणूक विभागाने याचे काम आठवडाभरापासून सुरू केले. फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांकडे याची माहिती दिली आहे. (प्रतिनिधी)