भाळवणीत आरक्षणामुळे उमेदवारांचा शोध
By Admin | Published: January 4, 2017 11:07 PM2017-01-04T23:07:28+5:302017-01-04T23:07:28+5:30
पंचायत समितीला इच्छुकांची गर्दी : पंचायत समितीचा एक गण ‘ओपन’, तर दुसरा ‘क्लोज’
अजित कदम ल्ल भाळवणी
अपवाद वगळता अनेक वर्षांपासून कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने कॉँग्रेस व शिवसेनेला उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. भाळवणी पंचायत समिती गण सर्वसाधारण खुला झाल्याने मोठी गर्दी झाली आहे, तर पारे गणात अनुसूचित जाती आरक्षण पडले आहे. त्यामुळे एक गण ‘ओपन’, तर दुसरा गण दिग्गज इच्छुकांसाठी ‘क्लोज’ झाला आहे.
भाळवणी जिल्हा परिषद गटात कॉँग्रेसमध्ये दुफळी असल्याने या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी शिवसेनेच्या मावळ्यांनी धनुष्य बाणाची दोरी ताणून धरली आहे. या गटात वीस ते पंचवीस वर्षे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधीत्व केले. २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांनी त्यांचा अवघ्या सात मतांनी पराभव केला. हा अपवाद वगळता या गटावर कायम कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. कॉँग्रेसचे डॉ. नामदेव माळी यांनी राष्ट्रवादीचे भरत लेंगरे यांचा पराभव केला. त्यावेळी शिवसेनेच्या संजय विभुते यांनीही ३९३१ मते घेतली होती. आळसंद गणातही कॉँग्रेसच्या सरिता पाटील विजयी झाल्या. मात्र, यावेळी अनुसचित जाती आरक्षण पडल्याने रामरावदादा पाटील यांच्या घरातील उमेदवारीला ब्रेक लागला आहे. भाळवणी गणातून आ. बाबर समर्थक विद्यमान सभापती सौ. वैशाली माळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाल्या होत्या. आता हा गण खुला झाल्याने सभापती सौ. माळी यांनाही दूर रहावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी कॉँग्रेसमधून कमळापूरचे गौतम गोतपागर यांच्या पत्नी सौ. वंदना गोतपागर, भाळवणीच्या सौ. सुलभा शशिकांत अदाटे ही नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतून पारे येथील पंचायत समिती सदस्या सचिता मिलिंद सावंत व बामणीच्या सरपंच सौ. कविता महावीर शिंदे हे आघाडीवर आहेत.
भाळवणी पंचायत समिती गणात कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विशाल पाटील व शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचे पुत्र माजी उपसभापती सुहास बाबर यांच्यातील लढतीचे संकेत आहेत. परंतु बाहेरचा उमेदवार कितपत चालणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.
आळसंद गण यावेळी रद्द करण्यात आला असून, पारे गणाचा समावेश झाला आहे. आळसंद गावाचा भाळवणी गणात समावेश झाल्याने भाळवणीतील इच्छुकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या गटात कॉँग्रेस व राष्ट्रवादीची युती होण्याचे संकेत आहेत. भाळवणी पंचायत समिती गणात यावेळी आळसंद, वाझर या गावांचा नव्याने समावेश झाला आहे. हा गण खुला असल्याने कॉँग्रेसमधून विशाल पाटील व शिवसेनेतून सुहास बाबर यांची नावे आघाडीवर असली तरी, कॉँग्रेसमधून मनोहर जाधव, राधेशाम जाधव, वाझरचे संग्रामसिंह जाधव, भाळवणीचे सयाजीराव धनवडे, मोहन धनवडे, केशव धनवडे, संजय मोहिते, डॉ. आनंदा शिंदे, संजय धनवडे, सागर सूर्यवंशी, बलवडीचे रघुनाथ पवार यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतून संजय विभुते, भाळवणीचे महेश घोरपडे, नामदेव चव्हाण, आळसंदचे नितीन जाधव, अमर जाधव, कमळापूरचे राहुल साळुंखे, बलवडीचे शामराव पवार यांच्या नावांची चर्चा आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी युतीचे संकेत असले तरी, आळसंदचे युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अजित जाधव इच्छुक आहेत.
पारे गण अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या गणात भाळवणी गणातील ढवळेश्वर, कळंबी, कुर्ली, तर जुन्या आळसंद गणातील खंबाळे-भा., कार्वे, मंगरूळ, बामणी, चिंचणी-मं. या गावांचा समावेश झाला आहे. येथे कॉँग्रेसमधून पारे गावचे रवींद्र माने यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. शिवसेनेतून बामणीचे महावीर शिंदे व पारे येथील प्रमोद लोखंडे यांचे नाव चर्चेत आहे.
भाळवणीला संधी द्यावी लागणार
या गटात भाळवणी गावाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. पंचायत समितीसाठी विशाल पाटील व सुहास बाबर यांनी उमेदवारी केल्यास कॉँग्रेस व शिवसेनेला जिल्हा परिषदेचा उमेदवार स्थानिक भाळवणी गावातीलच द्यावा लागणार आहे. भाळवणीकरांची स्थानिक उमेदवारांना पहिली पसंती मिळत असल्याने या दोन्ही पक्षांना भाळवणीचा विचार करावाच लागणार आहे.