रेठरेतील मोरे बंधूंची उमेदवारीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:11+5:302021-06-19T04:18:11+5:30
नितीन पाटील बोरगाव : कृष्णेच्या रणांगणावर बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात रेठरेतील मोरे भावबंधकीने उमेदवारीत बाजी मारली आहे. इतिहासात पहिल्यांदाच रयत पॅनलने ...
नितीन पाटील
बोरगाव : कृष्णेच्या रणांगणावर बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात रेठरेतील मोरे भावबंधकीने उमेदवारीत बाजी मारली आहे. इतिहासात पहिल्यांदाच रयत पॅनलने बोरगावला डावलून रेठरेहरणाक्षमध्ये दोन मोरे बंधूंना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे रयत व सहकार पॅनलमधून रेठरेहरणाक्ष गावातील तीन मोरे बंधू आपले
नशीब आजमवणार आहेत. यात संस्थापक पॅनलने मात्र
पवार भावकीला उमेदवारी देऊन वेगळा डाव साधल्याचे बोलले जात आहे. रेठरेहरणाक्ष येथे ११६५ मतदान आहे. कृष्णेच्या मैदानावरील घाटाखालचे किंगमेकर गाव म्हणून रेठरे परिचय आहे. या गावात मोरे-पवार-शिंदे यांचे वर्चस्व असून यांचेच ९० टक्के मतदान असल्याने याच भावबंधकीत उमेदवारी असते.
या निवडणुकीत रयत पॅनलचा बोरगावला तगडा उमेदवारच सापडला नाही. त्यामुळे पारंपरिक नियम मोडत रयतने रेठरेहरणाक्षला दोन उमेदवार दिल्याने मोरे भावकीने बाजी मारली आहे.
सहकार पॅनलकडून जयवंत ऊर्फ जे. डी. मोरे यांना उमेदवारी दिली आहे, तर रयत पॅनलकडून दिलीप मोरे व ॲड. विवेकानंद मोरे या दोघांना उमेदवारी दिली आहे.
मोरे भावबंधकीला शह देण्यासाठी संस्थापक पॅनलने महेश पवार यांना उमेदवारी दिली आहे. या भावबंधकीच्या राजकारणाचा कोणाला याचा फायदा होणार हे येणार काळच ठरवणार आहे.
बोरगावमधील चित्र यापेक्षा वेगळे आहे. याठिकाणी संस्थापक सहकार या दोन गटात काटा लढत होणार आहे. संस्थापक पॅनलचे माजी संचालक उदयसिंह शिंदे व सहकार पॅनलचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांची
उमेदवारी निश्चित झाल्याने ही लढत जोरात होणार हे नक्की आहे. या राजकारणाच्या तिढ्यात नाराजांची व बोरगावकरांची काय भूमिका असणार यावर रेठरेहरणाक्षच्या मोरे बंधूंचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
चौकट:
नाराज बहुसंख्य
सध्या तिन्ही पॅनलमधून इच्छुक नाराजांची संख्या मोठी आहे. ते शरीराने पॅनलचे काम करत असले तरी मनाने मात्र द्विधा मन:स्थितीत आहेत. या डावललेल्या उमेदवारांची पार्टीप्रमुख मनधरणी कशी करणार यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.