देववाडी घटनेचा कॅन्डल मार्चने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:28+5:302021-01-25T04:27:28+5:30
मांगले : देववाडी (ता. शिराळा) येथे विवाहित महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी रात्री गावात कॅन्डल मार्च ...
मांगले : देववाडी (ता. शिराळा) येथे विवाहित महिलेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी रात्री गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला. गावातील सर्व महिला, तरुणी, युवक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ‘नराधमाला फाशी द्या, आमच्या लेकीला न्याय द्या’ अशी मागणी केली.
देववाडी येथे शेतात पाणी पाजण्यास गेलेल्या ३५ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी धनाजी खोत याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर शनिवारी गावात तणावाचे वातावरण होते. या मृत महिलेचा रक्षाविसर्जन विधीवेळी जमलेल्या ग्रामस्थ व महिला वर्गातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीला ताब्यात दिल्याशिवाय रक्षाविसर्जन करणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतली. गावातील प्रमुखांनी आक्रमक महिला व ग्रामस्थांना शांत करून संयम राखण्याचे आवाहन केले. यानंतर वातावरण शांत झाले.
चाैकट
ग्रामस्थ कुटुंबाच्या पाठीशी
मृत महिलेचे कुटुंब पोरके झाले. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने मुलाच्या शिक्षणाचा खर्च ग्रामस्थांनी एकीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण गाव या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहे.
चाैकट
सोमवारी मोर्चा
शनिवारी दिवसभर गावातील दुकाने, संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सोमवारी शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला.
चाैकट
संशयितास कोठडी
दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी धनाजी खोत याला पोलिसांनी अटक केली. यामध्ये त्याने खुनाची कबुली दिली असून, त्याला शनिवारी शिराळ्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.