बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:27 AM2021-07-27T04:27:15+5:302021-07-27T04:27:15+5:30
शरद जाधव लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या अद्यापही कायम असताना, त्यावरील प्रभावी उपाय म्हणून लसीकरण सुरु ...
शरद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या अद्यापही कायम असताना, त्यावरील प्रभावी उपाय म्हणून लसीकरण सुरु आहे. यातही हायरिस्क व बेडवरुन उठताही येत नसलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी आता प्रशासनाने नियोजन केले असून, लवकरच ज्या रुग्णांना बेडवरुन उठताही येत नाही, त्यांना घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असले तरी महापुरामुळे त्याला ‘ब्रेक’ लागला आहे. या कालावधीत सर्व मार्ग बंद असल्याने लसींची उपलब्धता होऊ शकली नाही. त्याअगोदरच प्रशासनाने गेल्या आठवड्यात सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व हायरिस्क असलेल्या रुग्णांसाठी विशेष अभियान राबविले होते. या दोन्ही गटातील व्यक्तींना रांगेत उभे न करता, थेट लस देण्यात आली. या आठवड्यापासून बेडवर असलेल्या रुग्णांसाठी लसीकरण सुरु करण्यात येणार होते. मात्र, महापुरामुळे नियाेजन लांबणीवर पडले आहे.
चौकट
महापुरामुळे लसीकरणाला लागला ‘ब्रेक’
गुरुवारी जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण होईपर्यंत नियमितपणे लसीकरण सुरु होते. पण पाणीपातळी वाढल्यानंतर लस घेऊन येणारे सर्व मार्ग बंद झाल्याने पुढील मोहीम थांबली आहे. त्यातच सर्व यंंत्रणा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याने यात अडचणी होत्या. तरीही मंगळवारपासून लसीकरण पुन्हा सुरु करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
चौकट
हायरिस्कमध्ये कोण?
६० वर्षांवरील व सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश हायरिस्कमध्ये होत असला तरी यापेक्षा कमी वयोगटातील मात्र इतर आजार असलेले, औषधोपचार सुरु असलेल्या नागरिकांचाही यात समावेश होतो.
कोट
या आठवड्यापासून बेडवर असलेल्या रुग्णांना घरी जाऊन लस देण्याचे नियोजन होते. मात्र, लसीची उपलब्धता नसल्याने त्यात अडचणी आल्या. तरीही लवकरच ही मोहीम सुरु करण्यात येत आहे.
- डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी
चौकट
जिल्ह्यात आतापर्यंत झालेेले लसीकरण
पहिला डोस ७,६३,६७९
दुसरा डोस २,९८,४३०
६० पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस २,७०,८७१
दुसरा डोस १,३१,०५७