आटुगडेवाडीनजीक अपघातात मुंबईची महिला ठार, चारजण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 07:04 PM2019-12-09T19:04:15+5:302019-12-09T19:09:47+5:30
जोरदार धडक बसल्याने कारमधील चालक इजाज मक्सळी, अजय कीर, सुवर्णा कीर, विजया नाईक हे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कºहाडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
कोकरुड : आटुगडेवाडी (ता. शिराळा) आणि लोहारवाडी (ता. कºहाड) दरम्यान कार व एसटी बसमध्ये झालेल्या धडकेत मुंबईची महिला ठार झाली, तर चारजण जखमी झाले. जखमींना कºहाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. उंडाळे (ता. कºहाड) पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
विजया विनायक नाईक (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे, तर अजय दत्तात्रय कीर (४३), त्यांची पत्नी अंजना अजय कीर (४२), आई सुवर्णा दत्तात्रय कीर (८९), इजाज अब्दुल अजीज मक्सळी (२९, सर्व रा. सिद्धिविनायक, प्रभादेवी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.
अजय कीर हे आपले कुटुंबीय व त्यांच्या नात्यातील विजया नाईक यांच्यासह मुंबईहून लांजा (रत्नागिरी) येथे नातेवाईकांकडे कारमधून (क्र. एमएच ४७, एन. ७८३०) निघाले होते. सकाळी आठच्या सुमारास क-हाड-रत्नागिरी मार्गावर आटुगडेवाडी आणि लोहारवाडीदरम्यान त्यांच्या कारला शेडगेवाडी येथून क-हाडकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र. एमएच १४, बी. टी. ४८५९) धडक दिली. यात कारमधील चालक इजाज मक्सळी, अजय कीर, सुवर्णा कीर, विजया नाईक हे चौघे गंभीर जखमी झाले. अंजना कीर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. यावेळी काहींनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनास्थळी बोलाविले. सर्व जखमींना तत्काळ कºहाड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना दुपारनंतर विजया नाईक यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बसमधील १७ जण जखमी
दरम्यान, या अपघातात बसमधील सतराजण किरकोळ जखमी झाले आहेत. यात ११ शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना स्थानिक रुग्णालायात उपचार करून घरी सोडण्यात आले.
क-हाड-रत्नागिरी मार्गावर आटुगडेवाडी ते लोहारवाडीदरम्यान एसटी बस धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.