‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 07:20 PM2021-12-22T19:20:02+5:302021-12-22T19:21:55+5:30

महिंद्रा कंपनीची सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी उद्या भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहिती दत्तात्रेय लोहार यांनी दिली.

The car made by Dattatraya Lohar from Devarashte was noticed by industrialist Anand Mahindra | ‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

googlenewsNext

देवराष्टे : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाचे 'दैनिक लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. तर या कारच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यांना बोलेरो कारची ऑफर देखील दिली आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा हे तत्रज्ञान क्षेत्रात काही विविध नाविन्य प्रयोग करणाऱ्या लोकांची नेहमीच दखल घेत असतात. त्यांचे ट्विटरवरून कौतुक करत त्यांच्या पाठिवर थाप देतात. इतकेच नाही तर असे प्रयोग करणाऱ्या किंवा देशाचे नाव उज्वल करणाऱ्यांना त्यांनी भेट म्हणून कार देवू केल्या आहेत. दत्तात्रय लोहार यांना अशीच कौतुकांची थाप त्यांनी बोलेरो कारची ऑफर दिली आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे की, हे वाहन नियमांचे उल्लंघन करत असल्याने स्थानिक अधिकारी लवकर किंवा नंतर वाहनचालकाला ते चालवण्यास थांबवतील. मी त्याला वैयक्तिकरित्या त्याच्या वाहनाच्या बदल्यात बोलेरो ऑफर करेन. आम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्याची निर्मिती महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. कारण संसाधनसंपन्न म्हणजे कमी संसाधनांत अधिक करणे होय असे म्हटले आहे.



दत्तात्रेय लोहार यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या ऑफर चे आभार मानले आहे. तसेच उद्या, गुरुवार (दि.२३) रोजी सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लोहार यांचे फॅब्रिकेशनचे छोटेसे वर्कशॉप व थोडी शेती आहे. सध्या सर्वांनाच घरी चारचाकी असावी असे वाटते; तसे दत्तात्रय यांनाही वाटत होते. परंतु बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे गाडी घेणे शक्य नव्हते. या परिस्थितीपुढे न झुकता स्वतः गाडी तयार करण्याचे त्यांनी ठरवले आणि सुरुवात केली.

भन्नाट जुळवाजुळव 

फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये भंगारात पडलेल्या दुचाकी गाडीचे इंजिन व जीपचे बोनेट, रिक्षाची चाके अशी भन्नाट जुळवाजुळव करून त्यांनी टुमदार चारचाकी गाडी तयार केली. ती आकाराने नॅनो गाडीपेक्षा लहान असून, प्रतिलिटर ४० ते ४५ किलोमीटर जाते. ताशी पन्नास किलोमीटर वेगाने धावते. एका वेळेस चार माणसे बसून प्रवास करू शकतात. ही गाडी बनवण्यासाठी सुमारे साठ हजार रुपयांचा खर्च आला. 

दुचाकीसारखी मारावी लागते किक 

गाडी सुरू करण्यासाठी बटन-स्टार्टरचा वापर न करता दुचाकीसारखी किक मारावी लागते. शिवाय इतर मोटारींप्रमाणे स्टेअरिंग उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूस बसवले आहे. ही अफलातून गाडी तयार करण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. 

दत्तात्रय लोहार अल्पशिक्षित मात्र..

दत्तात्रय लोहार अल्पशिक्षित असून त्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही. मात्र प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. हे त्यांनी सिद्ध केले आहे.

पवनचक्की, भांगलण यंत्राचाही प्रयोग

दत्तात्रय यांच्या मुलाने घरी चारचाकी असावी, अशी इच्छा व्यक्त होती. यातून ही कल्पना सुचली व दोन वर्षांपासून जुन्या सुट्या भागांची साठवणूक करून दोन महिन्यांत जुगाड जिप्सी तयार केली. यापूर्वी त्यांनी पवनचक्की आणि भांगलणीसाठी यंत्र तयार केले होते.

Web Title: The car made by Dattatraya Lohar from Devarashte was noticed by industrialist Anand Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.