गुन्ह्यात वापरलेली मोटार टोलनाक्यावरील कॅमेऱ्यात दिसली होती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:06+5:302021-02-25T04:33:06+5:30
सांगली : पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार कोगनोळी (निपाणी) येथील टोल नाक्याच्या सीसीटीव्ही ...
सांगली : पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली मोटार कोगनोळी (निपाणी) येथील टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली होती. टोल प्रशासनाकडे असलेल्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग रिपोर्ट’व्दारे या वाहनाचा क्रमांक शोधण्यात आला होता, अशी साक्ष टोल नाक्यावरील कर्मचारी नरेंद्र जोशी यांनी बुधवारी न्यायालयासमोर दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या न्यायालयात कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत.
शहर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. यात संशयितांवर सध्या खटला सुरू आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या सुनावणीत तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची साक्ष झाली तर बुधवारी टोलनाका कर्मचारी नरेंद्र जोशी यांची साक्ष झाली.
जोशी यांनी सांगितले की, सात नोव्हेंबरला मोटार गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही आले आहे. व्हेईकल ट्रॅकिंग रिपोर्टच्या माध्यमातून गाडीचा क्रमांक शोधण्यात आला होता. दरम्यान, लाड याच्या पत्नीच्या नावावर ती गाडी असल्याचे समोर आले होते. बचाव पक्षातर्फे ॲड. किरण शिरगुप्पे आणि विकास पाटील-शिरगावकर, ॲड. प्रमोद सुतार, सी. डी. माने आणि गिरीश तपकिरे यांनी काम पाहिले. आता पुढील सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे.