‘आयुष’च्यावतीने कार्डियाक रुग्णवाहिका तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:23+5:302021-09-08T04:33:23+5:30
सांगली : महापालिका आणि कुपवाड येथील आयुष सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्डियाक रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. ‘ना ...
सांगली : महापालिका आणि कुपवाड येथील आयुष सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्डियाक रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर लवकरच ती रुग्णसेवेत दाखल होणार आहे. शिवसेनेचे माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे, तर सर्व वैद्यकीय उपकरणे, साहित्य आयुष संस्थेने लोकसहभागातून जमा केले आहे. रावते यांनी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी १८ लाख रुपयांचा निधी महापालिकेला दिला. यातून अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी केली आहे. ती ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविण्यासाठी आयुष सेवाभावी संस्थेकडे दिली आहे. महापालिका आणि आयुषमध्ये तसा करार झाला आहे. महासभेत तसा ठराव करण्यात आला. कार्डियाकसाठी लागणारी सर्व वैद्यकीय उपकरणे, साहित्य आयुषने लोकसहभागातून जमा केली आहेत. गुजराती सेवा समाज संस्था, डॉ. दिलीप पटवर्धन, प्रवीण लुंकड, जयेश जैन, निमेश मजेठीया, आभाळमाया, प्रकाश शाह, स्व. उमेदलाल मोनजी शाह परिवार, स्व. नरेश उमेदलाल शहा, परेश डोसालाल मक्कीम परिवार, वसंतलाल एम. शाह अँड कंपनी, निनाद शाह यासह अनेक देणगीदारांनी मदत केली आहे.
चौकट
ना नफा ना तोटा रुग्णवाहिका
रुग्णवाहिकेचा देखभाल दुरुस्तीचा खर्च, चालक पगार, इंधन खर्च, वाहन विमा आदी खर्चही आयुष संस्थेनेच करायचा आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी वापरला जाणार नाही. अगदी अत्यल्प दरात उत्तम सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- अमोल पाटील, अध्यक्ष, आयुष सेवाभावी संस्था