कार्वेच्या शाळेत पोषण आहारच मिळाला नाही!
By admin | Published: January 8, 2015 11:12 PM2015-01-08T23:12:59+5:302015-01-09T00:13:18+5:30
विद्यार्थ्यांना राहावे लागले अर्धपोटी : कारवाईची मागणी
ऐतवडे बुद्रुक : कार्वे (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज, गुरुवारी पोषण आहार तयार केला नाही. अचानकपणे पोषण आहार रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारी अर्धपोटी राहावे लागले.
ही शाळा पहिली ते सातवीपर्यंत असून येथे १८८ मुलांसाठी आहार बनविला जातो. येथील शाळेत पोषण आहार तयार करण्याचा ठेका गावातील शिवतेज महिला मंडळाकडे आहे. मंडळाच्यावतीने एक महिला दररोज स्वयंपाक करुन देते. आज अचानक ही महिला शाळेत आली नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांची भंबेरी उडाली. ऐनवेळी आचारी न मिळाल्यामुळे पोषण आहारच तयार करण्यात आला नाही. दररोज शाळेत पोषण आहार मिळत असल्यामुळे बहुतेक सर्व विद्यार्थी जेवणाचा डबा घेऊन येत नाहीत. पण आहार न केल्यामुळे आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी जेवणासाठी सोडले. मात्र अनेक विद्यार्थ्यांना घरी जाऊनही जेवण मिळू शकले नाही. कारण बहुतेक पालक घरास कुलूप लावून शेतात गेले होते. शिवाय रोज मुले घरी जेवणास येत नसल्यामुळे अनेकांनी घरी दुपारचे जेवण शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे या मुलांना अर्धपोटीच राहावे लागले. शाळा गावापासून लांब आहे. त्यामुळे लहान मुलांना नाहक त्रास सोसावा लागला. या घटनेमुळे पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)