एक कोटीच्या अपहारप्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:57 PM2024-07-02T13:57:27+5:302024-07-02T13:57:45+5:30
तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल ...
तासगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव तालुक्यातील तासगाव, मार्केट यार्ड तासगाव, हातनूर, सिद्धेवाडी आणि निमणी या पाच शाखांत तब्बल एक कोटी ६२ लाख ६७ हजार ८३५ रुपयांचा अपहार झाल्याबाबत, जिल्हा बँकेच्या वतीने संबंधित नऊ कर्मचाऱ्यांवर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या निमणी शाखेत व्याज आणि शासकीय अनुदान खात्यातील ८ लाख ३२ हजार ९०० रुपये शाखेतील कर्मचारी प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी) आणि शाखाधिकारी विजय तुकाराम यादव (रा. पलूस) या दोघांनी संगनमताने अपहार केला आहे. प्रमोद कुंभार याने वैयक्तिक ८ लाख १२ हजार ४०० रुपयांचा आणि शाखाधिकारी यादव यांच्या संगनमताने २० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे.
सिद्धेवाडी शाखेत अविनाश दिलीप पाटील (रा. अंजनी), विनायक शंकर सूर्यवंशी (रा. नागेवाडी), सुरेश वसंतराव कोळी (रा. मांजर्डे) या तीन कर्मचाऱ्यांनी ४० लाख ८६ हजार ५६८ रुपयांची रक्कम शाखेतील सहा खातेधारकांच्या खात्यावर, परस्पर संमतीविना वर्ग करून अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतून कर्मचारी संजय कुमार पाटील (रा. शिरगाव) याने शासकीय अनुदानाची रक्कम सहा खातेदारांच्या वैयक्तिक खात्यावर परस्पर वर्ग करून ६४ लाख ५८ हजार ६८ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तासगाव शाखेत प्रमोद सुरेश कुंभार (रा. सांगलीवाडी), योगेश सुरेश वजरीणकर (रा. तासगाव), मारुती यशवंत हिले (रा. नांद्रे) या कर्मचाऱ्यांनी संगनमताने अवकाळी अनुदान, दुष्काळी निधी, संजय गांधी निराधार पेन्शन खाते, असे टप्प्याटप्प्याने एकूण ४८ लाख ९० हजार २९९ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी हबीब जहिरुद्दीन कुलकर्णी यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
नेलकरंजी शाखेतील तीन कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत ४८ लाख ८८ हजार ३७८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राेखपालासह तीन कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे (रा. तळेवाडी), प्रदीप गुलाब पवार (करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे (नेलकरंजी), अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारुण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली आहे.