लाच दिल्याप्रकरणी शिक्षकास सक्तमजुरी : सांगली-आटपाडीतील प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:46 PM2018-05-07T22:46:15+5:302018-05-07T22:46:15+5:30
सांगली : मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यासाठी आटपाडी येथील भवानी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्याप्रकरणी याच शिक्षण संस्थेतील सहाय्यक
सांगली : मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यासाठी आटपाडी येथील भवानी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्याप्रकरणी याच शिक्षण संस्थेतील सहाय्यक शिक्षक दगडू निवृत्ती कुंभार (वय ५३, रा. आटपाडी) यास दोषी धरुन एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी सोमवारी हा निकाल दिला.
भवानी एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संस्थेतील एक मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार होते. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या जागेवर नवीन मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यासाठी रावसाहेब पाटील यांनी संस्थेतील तीन सहाय्यक शिक्षकांना मुलाखतीस बोलाविले होते. यामध्ये दगडू कुंभार यांचाही समावेश होता. मुलाखती घेतल्यानंतर संस्थेने संचालक मंडळाची बैठक बोलाविली. या बैठकीत शिक्षक पिंजारी यांची मुख्याध्यापकपदी तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठरावही करण्यात आला होता. त्यानंतर कुंभारने पाटील यांची भेट घेऊन, ‘पिंजारी यांची नियुक्ती रद्द करुन त्यांच्या जागी माझी मुख्याध्यापकपदी नियुक्ती करा, यासाठी मी तुम्हाला एक लाख रुपये देतो,’ असे सांगितले. पण पाटील यांनी त्यास नकार दिला. तरीही कुंभारने त्यांना, ‘आता तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो व नियुक्ती केल्यानंतर उर्वरित पन्नास हजार रुपये देईन’, असे सांगितले. पण पाटील यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
मुख्याध्यापक पदावर विराजमान होण्यासाठी कुंभार हा पाटील यांच्या एकसारखा मागेच लागून राहिला. त्यामुळे पाटील यांनी कुंभार लाच देत असल्याची तक्रार सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल केली होती. या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली असता, यामध्ये कुंभार लाच देणार असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने रचलेल्या सापळ्याप्रमाणे पाटील यांनी कुंभारला लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा कुंभारने त्यांना २१ जून २०१२ रोजी सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे बोलावून घेतले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकचे पथक वेशांतर करुन थांबले होते. कुंभार याने पाटील यांना पन्नास हजाराची लाच दिल्यानंतर कुंभारला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारतर्फे या खटल्यात जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. चिप्रे यांनी सरकारतर्फे चार व बचाव पक्षातर्फे एक असे पाच साक्षीदार तपासले. फिर्यादी रावसाहेब पाटील, तपास अधिकारी व पंच यांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने कुंभारला एक वर्ष सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
पहिलाच निकाल
लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु लाच देत आहे, अशा तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण काहीच नाही. लाच घेतल्याप्रकणी आरोपींना शिक्षा झाली आहे. मात्र सांगलीत प्रथमच लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तसेच या गुन्ह्यातील आरोपी कुंभारला शिक्षाही झाली आहे.