राजू शेट्टींसह १५० जणांवर गुन्हा दाखल, लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:29 AM2023-12-04T10:29:16+5:302023-12-04T10:29:54+5:30
जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन करत तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन करत तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यावर ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि ऊस दरासाठी आंदोलनावरुन १० तास कारखाना बंद पाडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा सुद्धा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
गेल्या १ डिसेंबरला ऊस दराच्या प्रश्नावरून राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह इस्लामपूरमधील राजारामबापू कारखानाच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या १० तासांच्या काळात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद पाडले. त्यामुळे ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्याचे साखर, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झास्याचे सांगत कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दिलीप महादेव पाटील यांच्या तक्रारीनुसार, राजू शेट्टी, भागवत जाधव, महेश खराडे, संदीप राजोबा, अॅड. शमशुद्दीन संदे, रविकिरण माने, संतोष शेळके, राजेंद्र माने, स्वास्तिक पाटील, सूर्यकांत मोरे, काशीनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, बाबासाहेब सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, अनिल काळे यांच्यासह १५० जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे. राजारामबापू साखर कारखान्याकडून ३१०० रुपये पहिली उचल आणि गेल्या हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल ३२०० रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.