इस्लामपुरात तिघा सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:47+5:302021-07-14T04:32:47+5:30
फाेटाे : १२ प्रकाश पवार लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील एका महिलेने पतीसोबत मिळेल ते काम करून ...
फाेटाे : १२ प्रकाश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील एका महिलेने पतीसोबत मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका चालवताना तब्बल तीन सावकारांकडून १ लाख रुपये १० आणि १५ टक्के व्याज दराने घेतले. वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे व्याज आणि मुद्दल देता न आल्याने त्रास देणाऱ्या खासगी सावकारांविरुद्ध पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी दोघा सावकारांना अटक केली.
या प्रकरणी नेहा अशोक पाटील (३५, रा. शिवनगर, इस्लामपूर) या महिलेने साेमवारी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सोमा पवार (वय ३३, हवालदार कॉलनी, इस्लामपूर), सचिन जयजयराम बांदल (२६, रा. शिवनगर, इस्लामपूर) आणि जुबेर मुल्ला याची पत्नी (नाव माहीत नाही) अशा तीन सावकारांविरुद्ध खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेहा पाटील या महिलेने वर्षभरापूर्वी घरबांधणीसाठी पैसे कमी पडल्याने जाऊ दीपाली पाटील हिच्या मदतीने जुबेर मुल्ला कुटुंबाच्या ओळखीतील सावकार प्रकाश पवार याच्याकडून महिना १० टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने पैशाची परतफेड न झाल्याने पवार हा त्रास देत होता. त्यानंतर मुलाच्या आजारपणासाठी या महिलेने तोंडओळखीच्या सचिन बांदल यांच्याकडून १५ टक्के व्याजाने आठवड्याला ३ हजार रुपये देण्याच्या बोलीवर ३० हजार रुपये घेतले. व्याज देऊनही बांदल हा मुद्दल देण्यासाठी त्रास देत होता. परत काही दिवसांनी नेहा पाटील यांनी घरगुती कार्यक्रमासाठी जुबेर मुल्ला यांच्या पत्नीकडून (नाव, पत्ता माहीत नाही) १० टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले. या तिन्ही सावकारांचा त्रास असह्य झाल्याने नेहा पाटील हिने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली.