निवडणूक प्रक्रियेत अडथळा; कऱ्हाडात महिला ‘बीएलओ’वर गुन्हा

By संजय पाटील | Published: November 13, 2024 11:34 PM2024-11-13T23:34:20+5:302024-11-13T23:34:30+5:30

पर्यवेक्षकांची पोलिसात फिर्याद; तत्काळ निलंबनाचा प्रस्तावही पाठवला

Case has been registered against women BLO in Karhad for obstructing the election process | निवडणूक प्रक्रियेत अडथळा; कऱ्हाडात महिला ‘बीएलओ’वर गुन्हा

निवडणूक प्रक्रियेत अडथळा; कऱ्हाडात महिला ‘बीएलओ’वर गुन्हा

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एका बीएलओ यांनी मतदार ओळख चिठ्ठ्या ताब्यात घेऊन त्या वाटप करण्यासाठी पर्यवेक्षकांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केला. याप्रकरणी संबंधित बीएलओ यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

तेजस्विनी ऋषिकेश कुंभार (रा. पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्या बीएलओचे नाव आहे. याबाबतची तक्रार पर्यवेक्षक संग्राम प्रकाश गाढवे यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तेजस्विनी कुंभार यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रातील यादी भाग क्रमांक १३६ च्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तेजस्विनी कुंभार यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसा त्यांनी आदेशही स्वीकारलेला आहे. त्यानुषंगाने ११ नोव्हेंबर रोजी पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांनी फोनवरून भाग क्रमांक १३६ च्या मतदार ओळखचिठ्ठ्या ताब्यात घेऊन त्या वाटप करण्यासाठी सूचना केली असता बीएलओ कुंभार यांनी फोनवरूनच या कामास नकार देऊन निवडणूक कर्तव्य नाकारले. तसेच वेळेत कामकाज न करून निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केला. वारंवार सूचना देऊनही निवडणुकीचे कामकाज केले नाही. याशिवाय फोन न उचलणे, नोटीसला उत्तर न देणे अशारीतीने निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला.

दरम्यान, तेजस्विनी कुंभार यांनी कर्तव्य नाकारल्याबाबत पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांनी वरिष्ठांना लेखी कळविले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून तेजस्विनी कुंभार यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांनी मुदतीत खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात अतितात्काळ व महत्वाच्या कामकाजामध्ये जाणीवपूर्वक अडथळा केल्याबाबत तत्काळ सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.

Web Title: Case has been registered against women BLO in Karhad for obstructing the election process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.