गुजरातमधील भंगार व्यवसायाची नोंदणी जत तालुक्यातील खेड्यात, जीएसटीच्या नावे घातला दोन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 12:58 PM2022-01-14T12:58:07+5:302022-01-14T12:58:39+5:30
देवीदास चाैगुले या शेतकऱ्याचे पॅन आधार व फोटोचा वापर करून जीएसटी नोंदणी करण्यात आली. या नोंदणीच्या आधारे गुजरातमध्ये बँक खाते उघडून भंगार व्यवसायातून आर्थिक उलाढाल करण्यात आली.
मिरज : कुडनूर, ता. जत येथील शेतकऱ्याच्या नावे जीएसटी नोंदणी करून दोन कोटी रुपये जीएसटीची बिले फाडणाऱ्या गुजरातमधील भंगार व्यावसायिकाविरुद्ध जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जीएसटी कुडनूर येथील देवीदास चाैगुले यांची चाैकशी केल्यानंतर त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे निष्पन्न झाले.
दोन कोटी रुपये फसवणूकप्रकरणी जीएसटी विभागाने गुजरातमधील महुवा येथील अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देवीदास चाैगुले या शेतकऱ्याचे पॅन आधार व फोटोचा वापर करून जीएसटी नोंदणी करण्यात आली. या नोंदणीच्या आधारे गुजरातमध्ये बँक खाते उघडून भंगार व्यवसायातून आर्थिक उलाढाल करण्यात आली. देवीदास चाैगुले यांच्या कागदपत्रांच्या आधारे सांगली जीएसटी विभागाकडे बनावट करुन नोंदणी केलेल्या या उद्योगामार्फत सुमारे दोन कोटीची बोगस बिले तयार करून या उलाढालीच्या ३० लाख परताव्याची मागणी केल्यानंतर या प्रकरणाची चाैकशी करण्यात आली.
कुडनूर येथे संबंधित भंगार उद्योग अस्तित्वात असून केवळ कागदावरच असलेल्या या उद्योगाने कोणताही व्यवसाय न करता दोन कोटीच्या जीएसटी पावत्या दिल्या. या पावत्यांच्या आधारे ३० लाख रुपये जीएसटी परतावा घेण्याचा प्रयत्न केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
देवीदास चौगुले म्हणतात..मला काहीच माहीत नाही
या घोटाळाप्रकरणी कुडनूर येथील देवीदास चाैगुले या शेतकऱ्याच्या चाैकशीत चाैगुले यांना त्यांच कागदपत्रांच्या आधारे जीएसटी नोंदणी झाल्याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले. याबाबत जीएसटीचे अधीक्षक एन. एम. तेलंग यांनी जत पोलिसांत गुजरातमधील संबंधित बँक खातेधारक व मोबाइल क्रमांकधारकाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे.