प्रकाश आंबेडकरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:07 AM2018-01-08T00:07:09+5:302018-01-08T00:07:09+5:30
सांगली : कोरेगाव-भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागल्यानंतर एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
चौगुले म्हणाले, जातीयवाद्यांनी संभाजीराव भिडे (गुरुजी) यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध ‘अॅट्रॉसिटीचा’चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. कोेरेगाव-भीमा प्रकरणामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील वातावरण दूषित झाले आहे. ३ जानेवारीला महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला; पण या बंदला हिंसक वळण लागले. जाळपोळ, दगडफेक केली. खासगी व शासकीय मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. एका महिलेने गुरुजींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीबाबतही संभ्रमावस्था आहे. जातीयवादी शक्तीने ‘कट’ रचून हा प्रकार घडवून आणला आहे. बंद काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक-दोघांचा बळी गेला. यास प्रकाश आंबेडकर कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच तोडफोडीत जे काही नुकसान झाले, ते त्यांच्याकडून वसूल करावेत. भिडे गुरुजींविरुद्ध जे गुन्हे दाखल केले आहेत, ते शासनाने सन्मानपूर्वक मागे घेऊन काढून टाकावेत. गुरुजींनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही.
शिवप्रतिष्ठानतर्फे गावभागातील हरिदास भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी १८ पगड जातीच्या बांधवांनाही बोलाविण्यात आले होते. यामध्ये कळंबी (ता. मिरज) येथील वीर शिदनाक इनामदार यांचे पंधरावे वंशज अभिजित इनामदार, तसेच अभिमन्यू भोसले, अंकुश माने, शशिकांत नागे, महेंद्र चंडाळे, दत्तात्रय माळी, प्रदीप बर्गे, संतोष लोखंडे, सचिन पवार, मनोहर साळुंखे, धनंजय सूर्यवंशी, अमित करमुसे, संजय गोसावी, गणेश कोडते, विनायक एडके, मोहन पतंगे, विजय काबरा, गोविंद नगरकर उपस्थित होते. या सर्वांनी, भिडे गुरुजींविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे, शासनाने हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करुन, आम्ही सर्वजण भिडे गुरुजींच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
मुंबईत बसून बोलू नये
वीर शिदनाक इनामदार यांचे वंशज अभिजित इनामदार म्हणाले, २०१२ मध्ये भिडे गुरुजी पाच हजार धारकºयांंना घेऊन कळंबी येथे वीर शिदनाक यांच्या स्मारकास मानवंदना देण्यास आले होते. कोरेगाव-भीमा येथील हे प्रकरण मतांच्या राजकारणाचा डाव आहे. पण आंबेडकरवादी जनता त्यांचा हा डाव आणून पाडेल.
मुंबईत बसून कोरगाव-भीमा प्रकरणावर बोलणारे कधीही कळंबीत वीर शिदनाक यांच्या स्मारकावर नतमस्तक होण्यास आले नाहीत, असा टोलाही इनामदार यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला.