दुष्काळ निधी घोटाळा: सांगली जिल्हा बँकेच्या निलंबित १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
By हणमंत पाटील | Published: June 25, 2024 11:39 AM2024-06-25T11:39:52+5:302024-06-25T11:40:34+5:30
सहा शाखांत दोन कोटी ४३ लाखांचा अपहार
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दुष्काळ निधीमध्ये विविध ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. आता त्या १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निधी जमा होताे. मात्र, शेतकऱ्यांना याची कल्पना नव्हती. त्यामुळे हा निधी घेण्यासाठी संबंधित लाभार्थी बॅंंकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे बसरगी, नेलकरंगी, तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, हातनूर या ६ शाखेत एकूण दोन कोटी ४३ लाखांच्या निधीचा अपहार काही अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांनी केला. मात्र, काही दिवसांनी हा घोटाळा उघडकीस आला.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळाच्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात आठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम करण्यात आली. त्यानंतर दोषी आढळलेल्या आणखी काही कर्मचाऱ्यांवरही बँकेकडून तातडीने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार १३ कर्मचाऱ्यांवर जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संबंधित कर्मचारी काम करीत असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये अपहाराचे गुन्हे दाखल केले आहेत, असे वाघ यांनी सांगितले.
गुन्हा दाखल केलेले कर्मचारी..
दुष्काळ निधी घोटाळा प्रकरणी प्रमोद कुंभार, योगेश वजरनीकर, मारुती हिले, संजय पाटील (तासगाव), अविनाश पाटील, अविनाश सूर्यवंशी, सुरेश कोळी (सिद्धेवाडी), विजय यादव (निमणी), बाळासो सावंत (पलूस), इंद्रजित वाघमारे (बसरगी), मच्छिंद्र म्हारगुडे, प्रतिक पवार व दिगंबर शिंदे (नेलकरंगी) या १३ कर्मचाऱ्यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.