'हप्ते व राजकीय पाठबळाने मिरज बनले 'कॅसिनो सिटी', २५ मिनिटांत लाखांचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 07:33 PM2022-02-04T19:33:57+5:302022-02-04T19:34:19+5:30
'पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरीचे प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत.
सांगली : पोलीसांची हप्तेखोरी व राजकीय पाठबळामुळे मिरज शहर कॅसिनो सिटी बनल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी केला. सांगली आणि कुपवाडमध्येही क्लब वाढत आहेत. याविरोधात मारूती चौकातून आवाज उठविण्याचा इशारा त्यांनी पत्रकार बैठकीत दिला.
पवार म्हणाले, आठ दिवसांत पोलिस व जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरू. प्रसंगी न्यायालयात दाद मागू. मिरजेत आठवड्यापूर्वी अडीच कोटींचे चंदन पकडले गेले. त्यामुळे चंदन तस्करीची साखळी अजूनही कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जुगार अड्डयावर दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करताना मारामारीचे ठिकाण व कारण बदलल्याची माहिती आहे.
१५ वर्षांपूर्वीपर्यंत मिरज शहर चंदन आणि मानवी तस्करीचे केंद्र होते. सध्या पुन्हा एकदा कॅसिनो सिटी अशी ओळख बनली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमिनी दिलेल्या तरुण शेतकऱ्यांना भरपाईपोटी कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. त्यांना जुगार अड्डयांची भुरळ घातली जात आहे. त्यातून लूट केली जात आहे.
पवार म्हणाले, तस्करी आणि जुगार क्लबना राजकीय पाठबळ आहे. हप्तेखोरी व राजकीय आशीर्वादाने गुन्हेगारी फोफावली आहे. सांगली व कुपवाडमध्येही त्याची लागण होत आहे. यामुळे महापालिका क्षेत्र गुन्हेगारांचे आगर होण्यास वेळ लागणार नाही. जुगार क्लबमधील हल्ल्याप्रकरणी आमच्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. पोलिस आणि जिल्हा प्रशासन दबावाखाली वावरत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे पोलिसांवर शिरजोरीचे प्रकार यापूर्वी मिरजेत घडले आहेत.
२५ मिनिटांत लाखांचा खेळ
पवार म्हणाले की, कॅसिनो क्लबमध्ये २५ मिनिटांत एक लाख रुपयांचा खेळ होतो. यातील १५ टक्के मालकाला मिळतात. त्यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. ती बंद करण्यासाठी पोलीसांना आठवडाभराची मुदत देत आहोत. महापालिका क्षेत्रातील अवैध धंदे बंद केले नाहीत, तर रस्त्यावरची लढाई सुरु करु.